‘चांद्रयान २’ या मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं होतं. मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. आता लँडरशी संपर्क होऊ शकेल की नाही, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता ब्रॅड पिटसुद्धा हा प्रश्न विचारण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. ब्रॅडने आंतरराष्ट्रीय अवकाश तळावरील (ISS) अमेरिकन अंतराळवीर निक हेगशी संपर्क साधला होता. नासा टीव्हीवर हा कॉल प्रसारित करण्यात आला. पिटच्या आगामी ‘अॅड अॅस्ट्रा’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त तो कॉल करण्यात आला होता.

या कॉलदरम्यान पिटने निक हेगला बरेच प्रश्न विचारले. त्यावर सकाळी ७.३० वाजल्यापासून संध्याकाळी ७.३० पर्यंत अंतराळवीर काम करत असल्याचं हेगने सांगितलं. त्याचसोबत भारताचा विक्रम लँडर सापडला का, असा प्रश्नही पिटने हेगला विचारला. त्यावर तो म्हणाला, ”दुर्दैवाने नाही.” हेग सध्या आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर इतर दोन अमेरिकन, दोन रशियन आणि एका इटालियन अंतराळवीरांसोबत राहत आहे.

22 जुलै रोजी इस्रोच्या वैज्ञानिकांनी चांद्रयान २ अवकाशात सोडलं होतं. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी इस्रोचे संशोधक 10 वर्षांपासून अथक प्रयत्न करत आहेत. परंतु विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किलोमीटपर्यंत पोहोचले असताना संपर्क तुटला होता. दरम्यान, लँडर सापडला असला तरी त्याच्याशी अजून संपर्क होऊ शकलेला नाही. अंतराळातील शोधमोहिमांमध्ये सर्वच देश सहभागी आहेत.