अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करुन आता बराच काळ लोटला आहे. मात्र अद्यापही त्याच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालं नाही. या घटनेनंतर बॉलिवूडमधील घराणेशाही, मक्तेदारी, गटबाजी यांच्यावरुन नवा वाद सुरु झाला आहेत. यात ‘काइ पो चे’ आणि अलिकडेच आलेल्या ‘ब्रीद’ या सीरिजमधील अभिनेता अमित साधनेदेखील त्याला कलाविश्वात कराव्या लागलेल्या संघर्षाविषयी सांगितलं आहे. ‘जनसत्ता’च्या वृत्तानुसार,  एकेकाळी आत्महत्या करण्याचा विचार त्याच्या मनात आला होता.

वयाच्या १६ व्या वर्षी अमितच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे ओघाओघाने घराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली. घर सांभाळण्यासाठी तो दिल्लीत नोकरी करण्यासाठी आला. इथे जोरबागमध्ये तो एका घरी घरकाम करत होता. परंतु, अमित शिकलेला असल्यामुळे त्याला इंग्लिश लिहिता-वाचता येत होतं. ही माहिती घरमालकाला मिळाल्यानंतर त्यांनी अमितला कामावरुन कमी केलं. ही नोकरी गेल्यानंतर एका सिक्युरिटी एजन्सीच्या माध्यमातून तो शो रुममध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करु लागला. परंतु, जीवन जगण्यासाठी रोज करावा लागणारा संघर्ष आणि मानसिक ताण यामुळे तो प्रचंड नैराश्यात गेला होता. इतकंच नाही तर या काळात अनेक वेळा त्याच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आला होता, असं म्हटलं जात आहे.

या संघर्षाच्या काळात त्याला ‘क्यो होता हैं प्यार’ या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण करण्याची संधी मिळाली. या मालिकेत नीना गुप्ता या मुख्य भूमिकेत होत्या. अमितचा स्वभाव रागीट असल्यामुळे अनेक वेळा त्याचे सेटवर वाद व्हायचे त्यामुळे त्याला मालिकेतून काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, नीना गुप्ता यांनी हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमितच्या याच स्वभावामुळे कलाविश्वातील अनेकांनी त्याला बॅन केलं होतं. विशेष म्हणजे असं असतानादेखील त्याने कोणत्याही गॉडफादरशिवाय त्याचं बॉलिवूडमधील स्थान भक्कम केलं.

दरम्यान, अमितने ‘काइ पो चे’, ‘गुड्डू रंगीला’, ‘सुलतान’,’ ब्रीद’, ‘ब्रीद: इन टू द शॅडोज’ या चित्रपट आणि सीरिजमध्ये झळकला आहे. लवकरच तो तिग्मांशू धुलिया यांच्या आगामी ‘यारा’ या चित्रपटातही झळकणार आहे.