08 March 2021

News Flash

आत्मचरित्रात सर्वच गोष्टी सांगता येत नाहीत

२ सप्टेंबरला प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिरात ‘आणि मग एक दिवस’ या मराठी आत्मचरित्राचे प्रकाशन होणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांचे उद्गार

सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात घडलेल्या काही खासगी गोष्ट जशा तो सांगू शकत नाही त्याचप्रमाणे सेलिब्रेटीही त्याच्या आयुष्यात घडलेल्या सर्व गोष्टी उघड करू शकत नाही. त्यामुळे माझ्या आत्मचरित्रातही मी आयुष्यात घडलेल्या सगळ्याच गोष्टी सांगितलेल्या नाहीत, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी मंगळवारी मुंबईत केले.

नसीरुद्दीन शाह यांच्या ‘अ‍ॅण्ड देन वन डे’ या इंग्रजी आत्मचरित्राचा मराठी अनुवाद ज्येष्ठ निर्मात्या आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांनी केला आहे. २ सप्टेंबरला प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिरात ‘आणि मग एक दिवस’ या मराठी आत्मचरित्राचे प्रकाशन होणार आहे. त्या निमित्ताने या पुस्तकाचे प्रकाशक पॉप्युलर प्रकाशनने एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी सई परांजपे, पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ हेही उपस्थित होते.पुस्तकात मी माझ्या मुलीबद्दल खरे तर काहीही लिहिणार नव्हतो. पण तिच्या लहानपणी मी तिचे चांगल्या प्रकारे संगोपन करू शकलो नाही, याची खंत माझ्या मनात होती. किमान लेखनाच्या माध्यमातून तिच्यावर झालेला हा अन्याय दूर करावा या उद्देशाने तिच्याबद्दल लिहिले आहे. राजेश खन्ना यांच्याबद्दल केलेल्या विधानाबाबत त्यांनी ‘प्रत्येक अभिनेता हा स्वत:च्या ताकदीवर नव्हे तर चित्रपटाचा दिग्दर्शक आणि लेखक यांच्यामुळेच मोठा होत असतो. लेखकाचे शब्द आणि विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे हेच फक्त अभिनेत्याचे काम आहे,’ अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर सई परांजपे म्हणाल्या, हे भाषांतर करीत असताना मी माझे व्यक्तिमत्त्व विसरून पूर्णपणे नसीरच्या व्यक्तिमत्त्वात शिरले आणि मूळ इंग्रजी आत्मचरित्राच्या गाभ्याला कुठेही धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेऊन हे भाषांतर केले.

डॉ. लागू यांचे आत्मचरित्र हिंदीत यायची वाट पाहतोय

ज्येष्ठअभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. पण ती पूर्ण झाली नाही.  डॉ. लागू यांनी लिहिलेले आत्मचरित्र मला वाचायचे आहे. ते हिंदीत अनुवादित होण्याची मी वाट पाहतोय.

– नसीरुद्दीन शाह

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2016 1:48 am

Web Title: can not say all the things in biographies says naseeruddin shah
Next Stories
1 रणवीरची जाहिरात ७५ कोटींची!
2 दीपिकाचीही कोटी कोटी उड्डाणे
3 सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार हे दमदार सिनेमे
Just Now!
X