पॉप संगीतातील एक झगमगता तारा म्हणजे गायक जस्टिन बिबर. मे महिन्याच्या १० तारखेला जस्टिन भारतात एका लाइव्ह कॉन्सर्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवी मुंबई पार पडणाऱ्या या लाइव्ह कॉन्सर्टसाठी सध्या सर्वजण उत्सुक असून, निर्माता- दिग्दर्शक करण जोहरचाही त्यात समावेश आहे. या भारत दौऱ्यामध्ये पूर्वनियोजित आराखड्याप्रमाणे सर्व काही सुरळीत पार पडले तर, करण या ग्लोबल स्टारच्या खास उपस्थितीत त्याच्या गाजलेल्या कार्यक्रमाच्या म्हणजेच ‘कॉफी विथ करण’च्या सहाव्या पर्वाची सुरुवात करणार आहे.

करण जोहरने आतापर्यंत त्याच्या या कार्यक्रमात बऱ्याच बॉलिवूड कलाकरांच्या मुलाखती घेतल्या आहेत. अगदी अनौपचारिक पद्धतीने करण त्याच्या खुमासदार शैलीत शोमध्ये येणाऱ्या सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतो. त्याची अनोखी शैली आणि त्याला मिळणारी कलाकारांच्या उत्तरांची साथ यांमुळे ‘कॉफी विथ करण’ प्रेक्षकांच्या आवडीचा कार्यक्रम आहे. आतापर्यंत फक्त बॉलिवूड सेलिब्रिटींनीच हजेरी लावलेल्या या कार्यक्रमात जस्टिन सहभागी झाला तर ग्लोबल सेलिब्रिटीची करणच्या शो मध्ये वर्णी लागण्याची ही पहिलीच वेळ असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती घेण्याची किंवा त्यांच्याशी संवाद साधण्याची करणची ही काही पहिलीच वेळ नाहीये. याआधी त्याने विविध कार्यक्रमांमध्ये रिचर्ड गेरे, मारिया शारापोव्हा, ह्यू जॅकमन, ख्रिस्तियां लूबटां या कलाराकारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्याशिवाय मेरिल स्ट्रीप, रॉबर्ट दे निरो, जॉर्ज क्लूनी यांच्यासोबतही करणने आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये संवाद साधला आहे. त्यामुळे आता जस्टिन त्याच्या पूर्वनियोजित रुपरेषेमधून वेळ काढत करणच्या शोमध्ये सहभागी होतो का हाच महत्त्वाचा प्रश्न आहे.

Concert preparation of Justin Bieber at D Y Patil stedium NAvi Mumbai. Express photo by Narendra Vaskar

Concert preparation of Justin Bieber at D Y Patil stedium NAvi Mumbai. Express photo by Narendra Vaskar

जस्टिनच्या या भारत दौऱ्यासाठी सध्या सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून कार्यक्रमाचे आयोजक सर्व काही सुरळीत पार पडण्यासाठी दक्षता घेत आहेत. सलमानची सुरक्षा व्यवस्था पाहणारा शेरा जस्टिनची सुरक्षाव्यवस्था पाहणार आहे. शेराने याआधी विल स्मिथ, जॅकी चॅन, पॅरिस हिल्टन, शॅगी, पीटर आंद्रे, डायना किंग, व्हिटफिल्ड या आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या सुरक्षेची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे.