कॉमेडियन कपिल शर्मा याने नुकतंच पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन केलं आहे. ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा सुरु झाल्याने चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. नुकतंच एका महिला चाहत्याने कपिल शर्माच्या शोवर आपल्या भावना व्यक्त करत आभार मानले. महिला कॅन्सग्रस्त असून त्या शूटिंगदरम्यान स्टुडिओत हजर होत्या. कपिल शर्माच्या शोमुळे आपल्यावरील तणाव आणि वेदना कशा कमी झाल्या याबद्दल त्यांनी सांगितलं.
‘शो पाहताना मी इतक्या जोरजोरात हसत असे की अनेकदा मला माझ्या आजार आणि वेदनांचा विसर पडायचा. मी तासनतास हसत असायचे’, असं महिलेने कपिल शर्माला सांगितलं. यावेळी त्यांनी कपिल शर्माने ब्रेक घेण्यावर नाराजीही व्यक्त केली.
महिलेने कपिल शर्माला सांगितलं की, ‘शोमुळे मला लवकर बरं होण्यास मदत मिळाली. शो बंद झाल्यानंतर मी प्रचंड नाराज झाले होते. आनंदी होण्यासाठी मी अनेकदा रिपीट टेलिकास्ट पाहत असे. तुम्ही पुनरागमन केल्याने मला प्रचंड आनंद झाला आहे. मला आता जगण्याची नवी उमेद मिळाली आहे’.
महिलेने आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर कपिल शर्मा आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासहित उपस्थित प्रेक्षकही भावनिक झालेले पहायला मिळाले. कपिल शर्माने पुढे जाऊन महिलेची गळाभेट घेतली आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. लवकरच तुम्ही अगदी ठणठणीत व्हाल अशा शुभेच्छाही कपिलने यावेळी दिल्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 8, 2019 1:35 pm