रिओ ऑलिम्पिक २०१६ दरम्यान भारताच्या खात्यात पहिल्या पदकाचे योगदान देत कुस्तीपटू साक्षी मलिक सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. रिओ २०१६ ऑलिम्पिक खेळांमध्ये महिलांच्या ५८ किलो वजनी गटात साक्षीने भारताला पहिले कांस्य पदक मिळवून दिले आहे. ऑलिम्पिकच्या बाराव्या दिवशी ८-५ अशा गुणांसह साक्षीने किर्गिजस्तानच्या आयसुलू तायनाबेकोव्हरला पराभूत केले. बचाव आणि आक्रमण याची सांगड घालत उत्तम साक्षीने खेळ केला. साक्षीच्या या कामगिरीमुळे सध्या तिला भारताची ‘सुलतान’ म्हणूनही संबोधले जात आहे.
असे असतानाच साक्षीने रिओमध्ये पदक मिळवल्यानंतर नेटिझन्सनीही तिला जणू डोक्यावर उचलून धरले आहे. ट्विटर, फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्किंग साइट्सवर साक्षी मलिकच्या ट्रेंडची लाटच आली आहे. सचिन तेंडुलकरपासून बिग बी अमिताभ बच्चनपर्यंत अगदी सर्वच कलाकार मंडळी आणि सेलिब्रिटींनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन साक्षी मलिकचे भरभरुन कौतुक केले आहे.