अभिनेता अक्षयकुमार आणि रजनीकांत स्टारर 2.0 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अवघ्या एका आठवड्यावर या चित्रपटाचं प्रदर्शन येऊन ठेपलं असताना सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही सीनमध्ये बदल करण्यास सांगितला आहे.

चित्रपट प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने १०० कोटींची कमाई केली असून सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला यू ए प्रमाणपत्र दिले आहे. मात्र चित्रपटातील काही शब्द आक्षेपार्ह असल्यामुळे ते म्यूट, तर काही रिप्लेस करण्यास सांगितले आहे. या चित्रपटात असे ७ सीन आहेत ज्यामध्ये बदल करण्यास स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, यात एका सीनमध्ये एका व्यक्तीच्या पोटातून मोबाईल फोन काढताना दाखवले गेले आहे. हे दृश्य धुसर करण्याचा आदेश सेन्सॉर बोर्डाने दिला आहे. त्याचबरोबर अनेक संवादांमध्येही बदल करण्यात आले आहेत.

बहुप्रतिक्षीत ठरत असलेला हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार असून येत्या २९ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.