सध्याच्या काळात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम असल्याचं म्हटलं जातं. सोशल मीडियाच्या माध्यमातून दूर कुठेतरी असलेल्या व्यक्तीशीदेखील थेट संपर्क करता येतो. त्यामुळे काळाची गरज म्हणून देखील या माध्यमाकडे पाहिलं जातं. याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात.मात्र, अजूनही काही लोकप्रिय सेलिब्रिटी या माध्यमापासून चार हात लांब असल्याचं दिसून येतं. यातलंच एक नाव म्हणजे निलेश साबळे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची यशस्वीपणे धुरा सांभाळणारा निलेश आतापर्यंत सोशल मीडियापासून लांब होता. मात्र, नुकतीच त्याने इन्स्टाग्रामवर दणक्यात एण्ट्री केली आहे.

‘काय मंडळी हसताय ना…हसायलाच पाहिजे’, असं म्हणत कार्यक्रमाची सुरुवात करणाऱ्या डॉ. निलेश साबळेचे आज असंख्य चाहते आहेत. त्यामुळे त्याच्याशी थेट संवाद साधावा, त्याच्याविषयीचे अपडेट्स जाणून घ्यावे अशी कायमच चाहत्यांची इच्छा असते. त्यामुळे चाहत्यांची ही इच्छा यापुढे पूर्ण होणार आहे. निलेशने अलिकडेच इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं असून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

निलेशच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चला हवा येऊ द्याच्या संपूर्ण टीमने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये निलेश साबळे त्याला फॉलो करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचसोबत हेच निलेशचं ऑफिशिअल अकाऊंट असल्याचंदेखील यावेळी त्यांनी सांगितलं आहे.