‘प्रेम’  या एका शब्दातच संपूर्ण जग सामावून गेलेलं आहे. प्रेम कथा वाचणे, पाहणे आणि ऐकणे ही मानवी स्वभावाची आवड आहे. प्रेमकथेवर आधारित असाच एक नवा कोरा  सिनेमा  आता लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. चितशक्ती पिक्चर्सच्या मीना खंडाळे, राजेश विठ्लानी यांची पहिलीच निर्मिती असलेला आणि अशोक विठ्लानी  यांची प्रस्तुती असलेला ‘चंद्रकोर’ हा सिनेमा येत्या २३ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. काव्यमय आणि उत्कट प्रेमकथा असलेल्या या ‘चंद्रकोर’ सिनेमाचे दिग्दर्शन राजेश बाळकृष्ण जाधव यांचे आहे.
chandrakor-01
लहानपणापासून मला स्वतःला वाचनाची खूप आवड आहे. आजवर अनेक कादंबऱ्या मी वाचल्या आहेत. ‘लावण्याची चंद्रकोर’ ही कादंबरी काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आली.  सरळ साधी अशी असलेली प्रेमकथा मला खूप आवडली. या कथेवर आपण एखादी कलाकृती तयार  करावी असे मी ठरविले आणि त्यातूनच ‘चंद्रकोर’ सिनेमाची निर्मिती झाली असे सिनेमाच्या निर्माती मीना खंडाळे यांनी सांगितले.    
‘चंद्रकोर’ सिनेमाची कथा निंबाजी हिवरकर यांची आहे तर पटकथा आणि संवाद शरद बजरंग दोरके  यांचे असून काही दिवसांपूर्वीच त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.  या सिनेमात अभिनेत्री मनीषा केळकर, जितु गोस्वामी, उदय सबनीस, जयराज नायर, गणेश यादव, प्राजक्ता केळकर, होनाजी चव्हाण, अशोक पाडवे, मीना सोनावणे, राजेश  उबाळे  आदी कलाकारांच्या भूमिका या सिनेमात पहायला मिळणार आहेत.
‘चंद्रकोर’ सिनेमात एकूण पाच गाणी असून पाचही गाणी वेगळ्या पठडीतील आहेत. निर्मात्या मीना खंडाळे यांनीच या सिनेमातील गाणी लिहिली असून विजय गटलेवार यांचे संगीत लाभले आहे. सुप्रसिद्ध गायिका उत्तर केळकर, साधना सरगम, जयश्री करंबेळकर, विजय गटलेवार आणि मिलिंद शिंदे यांच्या आवाजात सिनेमातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. कवी राम कदम फाउंडेशन तर्फे उत्कृष्ट गीतकार म्हणून प्रदान करण्यात येणारा ‘तापी-पूर्णा पुरस्कार’ मीना खंडाळे यांना मिळाला असून ५४व्या अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलनतही उत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार त्यांना या सिनेमासाठी मिळाला आहे.