बॉलिवूड कलाकार तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर #MeToo मोहिमेद्वारे अनेक महिलांनी आपल्यासोबत घडलेल्या घटना कथन केल्या आहेत. दरम्यान, एका महिलेने प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्यावर आपल्याला त्रास दिल्याचा आरोप करीत दोघांमध्ये झालेल्या व्हॉट्सअॅपवरील चर्चेचे स्क्रिनशॉट्स सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना चेतन भगत यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे संबंधीत महिलेची माफी मागितली आहे. या स्क्रिनशॉटचा उल्लेख करीत भगत यांनी आपली चूक मान्य केली आहे.

संबंधीत महिलेने व्हॉट्सअॅपवरील संभाषणाचे हे स्क्रिनशॉट सोशल मीडियात अपलोड केल्यानतंर ते व्हायरल झाले आहेत. या संभाषणामध्ये चेतन भगत त्या महिलेशी प्रेमाची भाषा करताना दिसत आहे. दरम्यान, हे संभाषण सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर भगत यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन याबद्दल जाहीर माफी मागितली आहे. तसेच असे संभाषण झाल्याचे त्यांनी मान्यही केले आहे. मात्र, हे संभाषण अनेक वर्षांपूर्वीचे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर या संभाषणात कोणतीही आक्षेपार्ह भाषा किंवा फोटो पोस्ट केलेले नाहीत. तसेच या संभाषणातील कुठलाच भाग डिलीट केलेला नाही.


आपल्याला संबंधित महिला खूपच छान, चांगली आणि खूपच वेगळी महिला वाटत होती. आपले लग्न झालेले असतानाही आपण अशा भावनांसह एखादे नातेसंबंध प्रस्थापित नाही करु शकत. मात्र, तरीही या महिलेशी माझ्या भावभावना जुळत असल्याचे मला वाटत होते. या महिलेशी आपण आगामी ‘वन इंडियन गर्ल’ या कादंबरीवरही चर्चा केल्याचा दावा भगत यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. या कादंबरीतही एकमेकांकडे आकर्षित होणाऱ्या भावनांचा उल्लेख आहे.

दरम्यान, या प्रकरणावरुन चेतन भगत यांनी आपली पत्नी अनुषा हीची देखील माफी मागितली असून बऱ्याच वर्षांत संबंधीत महिलेशी आपला संपर्कही झालेला नाही, तिचा नंबरही आपण डिलीट केला होता, असेही त्यांनी आपला बचाव करताना म्हटले आहे.