भारतीय अर्थव्यवस्थेला करोनाचा मोठा फटका बसला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून (NSO) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीत तब्बल २३.९ टक्क्यांनी घट झाली आहे. असाच काहीसा अहवाल जागतिक पतमानांकन संस्था असणाऱ्या ‘फिच रेटिंग्स’ने दिला आहे. त्यांच्या मते भारतासमोरील आर्थिक संकट पुढील काही काळ कायम राहणार आहे. दरम्यान या प्रतिकूल परिस्थितीवर प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “देशातील केवळ पाच टक्के लोक सोडले तर इतर ९५ टक्के लोकांना अर्थव्यवस्थेशी काही देणंघेणं नाही. वृत्तमाध्यमांद्वारे केल्या जाणाऱ्या मनोरंजनात ते व्यस्त आहेत.” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला आहे.

अवश्य पाहा – “आता खरी माहिती बाहेर पडेल”; सुशांत प्रकरणावर वकिल विकास सिंह यांची प्रतिक्रिया

चेतन भगत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ते रोखठोकपणे आपलं मत मांडतात. यावेळी त्यांनी घसरत जाणाऱ्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. “देशातील केवळ पाच टक्के लोकांना अर्थव्यवस्थेची चिंता आहे. उर्वरीत ९५ टक्के लोकांना अर्थव्यवस्थेशी काही देणंघेणं नाही. स्वस्तात मिळालेल्या 4G इंटरनेटचा आस्वाद घेण्यात ते व्यस्त आहेत. त्यांना केवळ मनोरंजन करणाऱ्या बातम्या हव्या आहेत.” अशा आशायाचं ट्विट चेतन भगत यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

“भारताचा जीडीपी २०२० च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये (ऑक्टोबर-डिसेंबर) उसळी घेईल. अनेक व्यवहार सुरळीत होण्याच्या पार्श्वभूमीवर हा बदल पहायाला मिळेल. मात्र सध्याच्या आर्थिक संकटामधून फटक्यामधून सावरताना अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग हा संथ आणि असमान राहील अशी चिन्ह दिसत आहेत,” असं फिचने अहवालामध्ये नमूद केल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. “भारताचा जीडीपी उणे १०.५ टक्क्यांपर्यंत राहील असा आमचा अंदाज आहे. ग्लोबल इकनॉमिक आऊटलूकने जूनमध्ये व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा हा पाच टक्क्यांनी अधिक घट दिसून येणार आहे,” असंही फिचने म्हटलं आहे. यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये भारताचा जीडीपी पाच टक्क्यांनी कमी होईल असा अंदाज यापूर्वी फिचने व्यक्त केला होता. मात्र आता हा थेट दुप्पटीने कमी होणार असल्याचे नवीन अहवालात नमूद करण्यात आलं आहे.