27 February 2021

News Flash

शिवाजी महाराजांच्या विचारांची जाणीव करून देणारा ‘छत्रपती शासन’

हा सिनेमा येत्या १५ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

छत्रपती शासन

नुसतंच जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष करून छत्रपती शिवाजी महाराजांवरील उथळ प्रेम दाखविण्यापेक्षा त्यांच्या आदर्शांची, विचारांची आणि तत्त्वांची कास धरण्याची आता गरज आली आहे. असं सांगणारा आणि त्यांची नेमकी भूमिका मांडणारा ‘छत्रपती शासन’ सिनेमा येत्या १५ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. प्रबोधन फिल्म्स आणि सवाई मार्तंड निर्मित आणि खुशाल म्हेत्रे दिग्दर्शित ‘छत्रपती शासन’ आजच्या तरुणाईला शिवशाही बद्दल अचूक मार्गदर्शन करणारा आहे. नुकताच या सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा पार पडला.

यावेळी तरुणाईला उद्देशून म्हेत्रे म्हणाले, ‘हल्ली आपल्याला प्रश्न पडणे थांबले आहे. मला प्रश्न पडला, महाराजांचे आयुष्य १८३०६ दिवसांचे होते, त्यातून नेमके काय शिकायचे ? काय बोध घ्यायचा? या पडलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच छत्रपती शासन हा चित्रपट आहे.’ प्रतिकांची, प्रतिमांची, पुतळ्यांची पूजा करण्यापेक्षा किंवा जय शिवाजी जोशात म्हणण्यापेक्षा शिवाजी महाराज नक्की काय म्हणतात हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटामार्फत केला गेला आहे. छत्रपती शासन सिनेमाच्या एकूण उत्पन्नाचा १० टक्के भाग हा भारतीय सेनेला देण्यात येणार आहे अशी घोषणा सह निर्माते अमर पवार यांनी यावेळी केली.

सिनेमातील अतिशय प्रेरक आणि स्फूर्ती देणारा ‘शिवबा छत्रपती’… हा पोवाडा नंदेश उमप यांनी गायला, लिहिला आणि संगीत दिग्दर्शित देखील केला आहे. सिनेमाची कथा गुंफणारं आणि रंगत वाढवणारं ‘मर्द मराठ्यांचं पोर’… हे गाणं अभिजीत जाधव आणि राजन सरवदे यांनी गायन, लेखन, संगीत दिग्दर्शित केलं आहे. या चित्रपटातील अभिनेते मकरंद देशपांडे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आतापर्यंत अनेक सिनेमे झाले आहेत. माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव आहे. सिनेमातील माझी प्राध्यापक समर ही भूमिका महाराजांची विचारधारा मांडणारी आहे.’ याच बरोबर सिनेमात अभिनेता संतोष जुवेकर, किशोर कदम, अभिजित चव्हाण, प्रशांत मोहिते, अनिल नगरकर, सायली काळे, प्रथमेश जोशी, श्रेयसचंद्र गायकवाड, विष्णू केदार, पराग शाह, अभय मिश्रा, धनश्री यादव, किरण कोरे, राहुल बेलापूरकर, सायली पराडकर, रामचंद्र धुमाळ, मिलिंद जाधव आणि जयदीप शिंदे यांच्या भूमिका आहेत. तसेच श्रीशा म्हेत्रे, रोमित भूजबळ, राजवर्धन धुसानीस, रेवा जैन ही बालकलाकार मंडळी देखील दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2019 5:03 pm

Web Title: chhatrapati shasan making you aware of the thoughts of chhatrapati shivaji maharaj
Next Stories
1 सलमानमुळे ऐश्वर्याने गमावला होता ‘चलते चलते’? ऐनवेळी राणीच्या पदरात आली मुख्य भूमिका
2 ‘जरा तरी लाज बाळगा’; भाजपा नेत्याला सिनेअभिनेत्रींनी सुनावले
3 अशी होती करिना-साराची पहिली भेट
Just Now!
X