बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री प्रीती झिंटा आणि अभिनेता सैफ अली खान यांचा ‘कल हो ना हो’ हा चित्रपट हिट चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन १७ वर्ष झाली आहेत. या चित्रपटातील बालकलाकार झनक शुक्ला आजही सर्वांच्या लक्षात आहे. तिने या चित्रपटानंतर अनेक मालिकांमध्ये काम केले. ती बालकलाकार म्हणून अतिशय लोकप्रिय होती. पण काही मालिका चित्रपटात काम केल्यानंतर तिने इंडस्ट्रीमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. आता झनक २५ वर्षांची झाली असून ती संध्या पैसे कमवत नसल्याचे तिने म्हटले आहे.
‘Brut India’ने नुकताच झनकचा व्हिडीओ शेअर केला आहे. या ३ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये झनक तिच्या करिअर विषयी बोलताना दिसत आहे. तिने बालकलाकार म्हणून मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. पण वयाच्या १५व्या वर्षी तिने चित्रपटसृष्टीमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती देशातील वेगवेगळ्या ठिकाणी फिरू लागली, ब्लॉग लिहू लागली. तिने घेतलेल्या या निर्णयाचे तिच्या कुटुबीयांनी स्वागत केले.
View this post on Instagram
१७ वर्षांनंतर कशी दिसते ‘कल हो ना हो’मधील जिया? पाहा फोटो
झनक ही आर्केओलॉजिस्ट म्हणजेच पुरात्त्वशास्त्रज्ञ आहे. तिने न्यूझीलंडमध्ये एका म्यूझियममध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जेव्हा ती इंडस्ट्रीमध्ये काम करत होती तेव्हा नेहमी विचार करायची की मी वयाच्या २४व्या वर्षापर्यंत भरपूर पैसे कमावणार आणि सेट होणार. पण आता ती २५ वर्षांची झाली असून पैसे कमवत नाही असे ती हसतहसत म्हणाली.
झनकने सोन परी, हातिम, करिश्मा का करिश्मा अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्यानंतर तिने बॉलिवूड चित्रपटात देखील काम केले. हिंदी व्यतिरिक्त तिने मल्याळम मालिकांमध्येही काम केले आहे.