ख्रिस्तोफर नोलन हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. आजवर त्याने ‘इन्सेप्शन’, ‘इंटरस्टेलर’ ‘बॅटमॅन ट्रायोलॉजी’, ‘डंकर्क’, यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. तो आपल्या चित्रपटांमध्ये स्पेशल इफेक्टऐवजी खूप मोठ्या प्रमाणावर रिअल लाईफ अॅक्शन सीन्सचा वापर करतो. असाच प्रकार त्याने ‘टेनेट’ हा चित्रपटात केला. या चित्रपटात तर त्याने एका खऱ्या खुऱ्या विमानाला इमारतीवर आदळवले. एका स्टंटसाठी केलेल्या या विमान अपघातावर त्याने स्पष्टीकरण दिलं आहे.

टोटल फिल्म या मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत नोलनने त्या विमान अपघातामागचे कारण सांगितले. “तो म्हणाला, हा चित्रपटातील अत्यंत महत्वाचा सीन होता. सुरुवातीला आम्ही एक लहान मॉडेल तयार करुन स्पेशल इफेक्टच्या सहाय्याने हा सीन शूट करणार होतो. परंतु त्यात मजा येत नव्हती. त्यामुळे स्टंटमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी मग खऱ्याखुऱ्या विमानाचा वापर केला. जेव्हा हा सीन प्रेक्षक चित्रपटात पाहतील तेव्हा त्याचा आवाका त्यांच्या लक्षात येईल.” विमान अपघाताचा हा किस्सा सर्वप्रथम डेव्हिड वॉशिंग्टन याने सांगितला होता. तो ‘टेनेट’मध्ये मुख्य व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.

नोलनच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘टेनेट’ असं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया देखील झळकणार आहेत. हा चित्रपट येत्या जुलै महिन्यात प्रदर्शित होईल अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु करनो विषाणूचे वाढते संक्रमण पाहता प्रदर्शनाची तारीख आणखी पुढे ढकलण्याची शक्यता आहे.