30 October 2020

News Flash

निव्वळ नेपथ्याला टाळी योग्य नव्हे; सबंध नाटकाला ती मिळायला हवी – प्रदीप मुळ्ये

‘आपल्या नेपथ्याला टाळी मिळाल्याने नेपथ्यकाराला जरी आनंद होत असला तरीही केवळ नेपथ्याला टाळी मिळणे उचित नाही. नाटकाची संहिता, त्यातला आशय आणि दिग्दर्शकीय दृष्टिकोनावर नेपथ्याने कुरघोडी

| June 14, 2013 12:15 pm

‘आपल्या नेपथ्याला टाळी मिळाल्याने नेपथ्यकाराला जरी आनंद होत असला तरीही केवळ नेपथ्याला टाळी मिळणे उचित नाही. नाटकाची संहिता, त्यातला आशय आणि दिग्दर्शकीय दृष्टिकोनावर नेपथ्याने कुरघोडी करणं कदापि योग्य नाही. संपूर्ण नाटय़प्रयोगाला प्रेक्षकांची दाद मिळायला हवी, तरच उत्तम नाटक सादर केल्याचं समाधान मिळतं,’ असे उद्गार मराठी रंगभूमीवरील अत्यंत प्रयोगशील ज्येष्ठ नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी काढले. आविष्कार सांस्कृतिक केंद्राच्या मुक्तचर्चा उपक्रमांतर्गत आयोजित गप्पांमध्ये ते बोलत होते. नाटककार शफाअत खान यांनी त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार आणि दिग्दर्शक म्हणून गेली ३०-३५ वर्षे मराठी रंगभूमीवर केलेल्या यशस्वी वाटचालीतील आपले समृद्ध नाटय़ानुभव त्यांनी यावेळी कथन केले. अत्यंत व्यामिश्र आणि गुंतागुंतीचा अनुभव देणाऱ्या लेखक शफाअत खान यांच्या एकांकिका व नाटकांचे नेपथ्य करणे मात्र आपल्याला आजही जड जाते, अशी कबुलीही त्यांनी यावेळी दिली. ‘चंद्रपूरच्या जंगलात’, ‘सावल्या’, ‘वाडा चिरेबंदी’ त्रिनाटय़धारा, ‘मिटली पापणी’, ‘दुर्गा झाली गौरी’, ‘सारे प्रवासी घडीचे’ आदी नाटकांचे नेपथ्य करताना आपण जाणतेपणी केलेले विविधांगी प्रयोग आणि त्यामागील विचार त्यांनी या गप्पांमध्ये विस्तारानं उलगडून दाखवले. व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांचे नेपथ्य करताना आपण वेगवेगळा विचार करत नाही, असे सांगून ते म्हणाले की, व्यावसायिक नाटकांचे नेपथ्य करताना मात्र ते लावण्या-काढण्यासाठी लागणारा संभाव्य वेळ, त्याचप्रमाणे बाहेरगावचे दौरे आणि एकूणात आपल्याकडच्या नाटय़गृहांची अवस्था आदी काही व्यावहारिक गोष्टी थोडय़ाशा विचारात घ्याव्या लागतात, इतकंच!  दिग्दर्शकानं नाटक समजावून देऊन त्यानुसार नेपथ्य करण्यापेक्षा मी स्वत: आधी जातीनं नाटक वाचतो. आणि मग त्या नाटकाच्या जातकुळीनुसार कशा प्रकारचे नेपथ्य त्यास योग्य ठरेल याची रूपरेषा माझ्या मनात पक्की होते. नंतर दिग्दर्शकाशी चर्चा करून त्याच्या अपेक्षाही मी जाणून घेतो. या सगळ्या प्रक्रियेनंतरच अंतिम नेपथ्य आकाराला येतं. नाटकातील प्रकाशयोजना, पात्रांची वेशभूषा या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. नेपथ्य तयार करताना त्याही आधी जाणून घ्याव्या लागतात. त्यांच्याशीही नेपथ्याचा मेळ घालणं गरजेचं असतं. माझ्यासाठी नाटक आकळण्याचा म्हणून एक बिंदू असतो, तो एकदा का सापडला, की नेपथ्य करणं सोपं जातं, असं ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2013 12:15 pm

Web Title: clap is only for set design is not good it should be for whole drama pradip mule
टॅग Drama,Entertainment
Next Stories
1 सत्तेचाळीस वर्षीय शाहरूख बनणार तिस-यांदा पिता?
2 बघा शाहरूख आणि दीपिकाच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ चे ट्रेलर
3 विद्या बालनला बनायचय सुपर मॉम?
Just Now!
X