“शेवटचा स्थलांतरित मजूर घरी पोहचेपर्यंत मी ही घर भेजो मोहीम सुरु ठेवणार आहे,” असं सांगणारा अभिनेता सोनू सुद सध्या बराच चर्चेत आहे. सोनूने परराज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचवण्याची ‘घर भेजो’ मोहिम हाती घेतली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २५ मार्चपासून लॉकडाउन सुरु आहे. लॉकडाउन सुरु झाल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक स्थलांतरित मजुरांचे हाल झाले आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकून पडलेल्या मजुरांनी चालत आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतल्याने मागील जवळजवळ दोन महिन्यांपासून देशातील अनेक राज्यांमधून मजूर चालत आपल्या राज्यांमध्ये परत जाताना दिसत आहे. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या लॉकडाउनमध्ये श्रमिक विशेष ट्रेन्सच्या माध्यमातून मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचवण्याची सुविधा देण्यात आली आहे. असं असलं तरी अनेक श्रमिकांना आपल्या राज्यात जाण्यात अडचणी येत आहेत. यासाठी सोनूने पुढाकार घेतला असून तो मुंबईसहीत देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये अडकलेल्या उत्तरेतील मजुरांना घरी पोहचवण्यासाठी बस गाड्यांची सोय करताना दिसत आहे. सोनूकडे थेट ट्विटवरुन मदतीची मागणी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या लोकांना सोनू थेट ट्विटवरुन मदत करतानाही दिसत आहे.

मदत मागण्याबरोबरच अनेकजण ट्विटवरुन सोनुचे कौतुक करत आहे आणि केलेल्या मदतीसाठी आभारही मानत आहेत. अनेकांना सोनु ट्विटवरुन उत्तरेही देत आहेत. बरं ही उत्तर देताना तो त्याची खास विनोदी शैली संभाळत अनेक भन्नाट ट्विट करत आहे. अगदी गर्लफ्रेण्डला भेटवण्यासाठी मदत करण्याची विनंती करणाऱ्यापासून ते अनेक क्रिकेटपटू आणि कलकारांच्या ट्विटलाही सोनु उत्तर देताना दिसत आहे. स्टॅण्डअप कॉमेडियन असणाऱ्या अतुल खत्रीने केलेल्या एका मिश्कील ट्विटही सोनुने स्मायली टाकून रिट्विट केलं आहे.

काय आहे या ट्विटमध्ये?

सध्या एकीकडे भारतासमोर करोनाचे आव्हान असतानाच दुसरीकडे भारत आणि चीन सिमेवरील तणावही वाढला आहे. येथील लडाख भागामध्ये काही दिवसांपूर्वी चीनी सैन्य दिसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. याच गोष्टीची सोनु करत असलेल्या मदतीशी सांगड घालत अतुल खत्रीने एक भन्नाट ट्विट करुन थेट चीनला इशारा दिला आहे. “प्रिय, चीनी लष्कर, तुम्ही भारतामध्ये घुसखोरी करण्याचा विचारही करु नका. आमच्याकडे सोनु सूद आहे. तो एकटाच दोन दिवसात तुम्हाला बिजींगमध्ये सोडून येईल. ते ही बसने. साभार सर्व भारतीय,” असं ट्विट अतुलने केलं आहे.

मागील अनेक दिवसांपासून सोनु आणि त्याची टीम मुंबईबरोबरच देशामधील इतर राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी काम करत आहे. या कामासाठी अगदी राजकारण्यांपासून कलाकारांपर्यंत आणि क्रिकेटपटूंपासून ते सामान्यांपर्यंत अनेकांनी सोनुचे कौतुक केलं आहे. मात्र अतुलने केलेलं हे आगळ्या वेगळ्या पद्धतीचं कौतुक नक्कीच मजुरांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणाऱ्या सोनुला हसवून गेलं असं म्हणता येईल.