जपानी कार्टून्सचा लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो, या आरोपाखाली अमेरिका, चीन, रशिया यांसारख्या अनेक देशांमध्ये त्यावर बंदी घालण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. त्यामुळे डोरेमॉन, शिनचॅन, पोकेमॉन, निंजा हतोरी यासारखे अनेक कार्टून्स आता भारत, पाकिस्तान, श्रीलंका असे काही मोजके देश वगळता इतर विकसित देशांमध्ये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. एकीकडे बंदीचे सत्र सुरू असतानाच दुसरीकडे ‘द केस क्लोज : डिटेक्टिव्ह कॉनन’ या जपानी कार्टून मालिकेने मात्र लोकप्रियतेची सर्वोच्च पातळी गाठली आहे.१९९४ साली लेखक गोशो आयोमा यांच्या कल्पनेतून निर्माण झालेला डिटेक्टिव्ह कॉनन आज जगातील सर्वात लोकप्रिय कार्टूनपैकी एक म्हणून ओळखला जातो. ‘टॉम अ‍ॅण्ड जेरी’नंतर सर्वात जास्त चाललेली ही जगातील दुसरी कार्टून मालिका आहे, परंतु प्रसिद्धी, लोकप्रियता आणि आर्थिक यश या तिन्ही पातळींवर मिकी माउस, स्कूबी डू, पॉपाय द सेलर मॅन यांसारख्या मोठमोठय़ा कार्टून व्यक्तिरेखांची बरोबरी साधणारा ‘कॉनन’ ऊर्फ ‘जीमी कुडो’ आता मात्र अनिश्चित काळासाठी विश्रांती घेणार आहे. २०१४ ते १७ या गेल्या चार वर्षांत कॉननने तब्बल १.१ दशलक्ष येनची विक्रमी कमाई केली होती. त्यामुळे लोकप्रियतेच्या सर्वोच्च पातळीवर असतानादेखील गोशो आयोमा यांचा मालिका थांबवण्याचा निर्णय चाहत्यांना आश्चर्यचकित करणारा आहे. दिग्दर्शक यामामोटो हे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांच्या मते त्यांनी चाहत्यांच्या भावनांचा विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. रहस्य किंवा गुप्तहेरपटात कथानकाला विशेष महत्त्व असते. त्यामुळे पटकथेत जितके नावीन्य असेल तितकीच ती कलाकृती उत्कंठावर्धक बनते. गेली २३ वर्ष सातत्याने काम केल्याने मालिकेच्या पटकथांमधील नावीन्य आता संपत आल्याची जाणीव लेखकांना होते आहे. शिवाय, ओढूनताणून काम केल्यामुळे मालिकेचा दर्जाही आता घसरत चालला आहे. त्यामुळे लेखकाच्या डोक्यातील मरगळ प्रेक्षकांच्या मनात उतरण्याआधीच त्यांनी गुप्तहेर कॉननची केस क्लोज करण्याचा निर्णय घेतला आहे.