26 September 2020

News Flash

जडणघडण विनोद

‘कमिंग ऑफ एज’ सिनेमामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर विनोद शक्यता सापडतात.

‘कमिंग ऑफ एज’ सिनेमामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर विनोद शक्यता सापडतात. वयात येतानाच्या लैंगिक अपसमजांपासून ते आचरणातील घोळाची विविध रूपे त्यात समाविष्ट असतात; पण बहुतांश सिनेमांतील दोषसाम्य शोधायला जाल, तर त्यातील नायक-नायिका सर्व गुणांचे अवतार म्हणूनच पाहायला मिळतात. म्हणजे ते देखणे असतात. त्यांच्यावर जगाकडून होणाऱ्या अन्यायाचे रूप म्हणजे ‘राजाच्या राज्यात सारी सुखे नांदत होती.. पण’ असे असते. गंमत म्हणजे ‘अंती विजयी ठरू’च्या आवेशात त्यांच्याकडून होणारी शेवटाची कामगिरी ही नेत्रदीपक आणि टाळीफेक असते. म्हणजे चित्रपट खेळावर असला, तर त्यातील पोरगं-पोरगी अनंत अडचणींवर मात करताना ‘चॅम्पियन’पदाची माळ घातलेलाच शेवटी पाहायला मिळतो. चित्रपट एखाद्या शैक्षणिक स्पर्धेवरचा असेल, तर त्यात स्मार्टपणाचे सारे विक्रम नायक-नायिकेने मोडून काढलेले असतात. नृत्य-अभिनयावर असेल तर त्याचे पदक हाती पाहायला मिळणे हा चित्रपटाचा परमोच्च बिंदू असतो. अटीतटीच्या क्षणांमध्ये ती व्यक्तिरेखा बाजी मारताना दिसते. जडणघडणीच्या काळातील या एकांगी थाटामुळे वेस अ‍ॅण्डरसनचा ‘रशमोर’, जेसन राइटमनचा ‘जुनो’ हे याच पठडीतील सिनेमे वेगळे ठरतात. ‘डोण्ट टॉक टू आयरिन’ हा कॅनडाचा सिनेमा ‘कमिंग ऑफ एज’ सिनेमांमध्ये रूढ झालेल्या संकल्पनांना वळसा घालून सादर होतो. यातील प्रमुख व्यक्तिरेखा आयरिन (मिशेल मॅकलिओड) ही तिच्या भवतालाच्या दृष्टीने अत्यंत टाकाऊ आणि निराशावादी मुलगी आहे. ती कुरूप आहे, लठ्ठ आहे आणि तिचे योग्यरीत्या सामाजिकीकरणही झालेले नाही. सोबत खेळायला आणि बोलायलाही कुणीच नसल्याने कचराकुंडीत सापडलेल्या किडय़ाशीही एकतर्फी मैत्री करणारी आयरीन आईच्या धाकात राहणारी आहे. फक्त तिच्या डोक्यातले खूळ हे ‘चिअर गर्ल’ बनण्याचे आहे.

कॅनडातील अ‍ॅलिस मन्रो आणि लॉरी मुर या लेखिकांनी चितारलेल्या तऱ्हेवाईक व्यक्तिरेखेसारखी ही आयरिन चित्रपटाच्या सुरुवातीलाच भेटते ती आईच्या ओरडण्यामुळे कचराकुंडीतून आणलेल्या किडय़ाला शौचकुपात टाकण्यापासून. आयरिनची सुडौल बांध्याची आई लिडिया (अनास्थेशिया फिलिप्स) तेरा वर्षांपूर्वी हायस्कूलमध्ये चिअर लीडर असताना झालेल्या अपघातात आयरिनचा अकाली जन्म झालेला असल्याने आयरिनविषयी तिचा रागच अधिक असतो. आपल्या या लठ्ठ मुलीचे एकल संगोपन करताना तिला टीव्ही, मोबाइल, इंटरनेट आदी सर्वापासून लिडियाने लांब ठेवलेले असते. लोकांनी तिच्या जाडपणाची खिल्ली उडवू नये, या एकाच गोष्टीबाबत ती गंभीर असते.

चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच चाणाक्ष आणि बुद्धिवादी विनोदाचा भरणा आहे. इथे विद्यार्थी, शिक्षक भाषिक नियमांवरून वाद घालताना दिसतात. शाळेच्या परिसरात आयरिनला म्हणावा तितका खिल्लीचा सामना करावा लागत नाही. ती स्वप्नाळू असली तरी आईने लादलेली सारी बंधने झुगारून देण्याची ताकद आहे. आईविषयीचा द्वेष तिच्या डोक्यात कायम दाखविला आहे. त्यामुळे एकलव्यी बाण्याने तिने हॉलीवूड अभिनेत्री जिना डेव्हिस हिचे छायाचित्र डकवून तिला आपला देव बनवून टाकले आहे. या देवाशी तिचा संवाद हाही एक गमतीशीर प्रकार आहे.

आपल्या चिअर लीडर बनण्याच्या स्वप्नाचा पाठपुरावा करताना शाळेतील इतर दोघांसोबत तिचे दोन आठवडय़ांसाठी निलंबन होते. त्या निलंबनकाळात शाळेशेजारीच असलेल्या वृद्धाश्रमात काम करण्यासाठी त्यांची रवानगी होते. या वृद्धाश्रमात फार लाडात वगैरे न येता किंवा कुणाचीही लाडकी न बनता ती चिअर लीडर्सची म्हातारी टीम तयार करते. टीव्हीवरील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खटपट सुरू करते. तिच्या प्रयत्नांना यश येते, पण म्हातारबुवा आणि बायांच्या चिअर लीडर्स क्लबला टीव्ही कार्यक्रमासाठी चाचणी द्यायला जाणे भाग असते. वृद्धाश्रमातील अतिबंडखोर तरण्या मनांचा आधार घेत ती तेही साध्य करायला जाते; पण आणखी मोठय़ा अडचणी समोर येतात.

‘कमिंग ऑफ एज’ सिनेमातील कैक पारंपरिक पुनरावृत्त्या टाळून या चित्रपटाची आखणी झाली आहे. इथल्या छोटय़ा-छोटय़ा गोष्टींत ते जाणवते. आयरिनचे आईशी भांडण होताना चालणारा टोकदार संवाद, तिच्या प्रामाणिक प्रयत्नांचा होणारा फज्जा आणि तिने शेवटी टीव्ही स्टेशनवर पोहोचता न येण्याचे स्वीकारल्यानंतर घडणाऱ्या घटना या अत्यंत गमतीशीर आणि या पठडीतील सिनेमांसाठी नवख्या आहेत. नव्वदीच्या दशकात कित्येक सिनेमांत नायिका म्हणून झळकलेली जीना डेव्हिसचे इथले छायाचित्र आणि वास्तव स्वरूपातील अस्तित्व गंभीर विनोद साधणारे आहे. ‘टेलर स्विफ्ट’च्या जागी मला आदर्श मानल्याबद्दल जीना डेव्हिसच्या छायाचित्राकडून मांडले जाणारे आभार प्रदर्शन विनोदाचा अफलातून नमुना आहे.

एकुणातच वयात येणाऱ्या व्यक्तिरेखांच्या साचीव आणि बेतीव प्रकाराहून वेगळे दाखविणाऱ्या या चित्रपटाकडे उत्तम मनोरंजन देण्याची ताकद आहे. जडणघडणीच्या काळाकडे पाहण्याची त्याची विनोदी नजर चांगल्या गोष्टी पाहण्याच्या आणि अनुभवायच्या वाढत चाललेल्या पसाऱ्यात चुकवू नये असा हा सिनेमा आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2018 3:12 am

Web Title: coming of age
Next Stories
1 भांडवलशाहीचा वेध घेणारा मि. रोबो
2 ‘रणबीर कपूर सर्वोत्तम अभिनेता’
3 सागर कारंडे पुन्हा रंगभूमीवर
Just Now!
X