लॉकडाउनमध्ये घरी बसून काय करावं असा प्रश्न अनेकांना पडला असेल. या प्रश्नांची उत्तर नवनवीन पद्धतीने शोधलीसुद्धा जात आहेत. हल्ली सोशल मीडियावर दररोज नवीन ट्रेण्ड पाहायला मिळत आहेत. त्यातलाच एक चर्चेतला ट्रेण्ड म्हणजे मित्रमैत्रिणींचे फेसबुकवरील जुने फोटो शोधायचे आणि त्यावर भन्नाट चारओळी पोस्ट करायच्या. एव्हाना तुम्हीसुद्धा हे काम केलंच असेल. नेटकऱ्यांनी याबाबतीत कलाकारांनाही सोडलं नाही. अनेक मराठी कलाकारांच्या फेसबुकवरील फोटोंवर नेटकऱ्यांनी भन्नाट चारओळ्या पोस्ट केल्या आहेत.

हेमंत ढोमे, हार्दिक जोशी, शर्मिष्ठा राऊत या कलाकारांच्या फोटोंवर एकापेक्षा एक कमेंट्स वाचायला मिळत आहेत.

काय आहे हा ट्रेण्ड?

मागील दोन दिवसांपासून फेसबुकवर एक ट्रेण्ड सुरू झाला आहे. यामध्ये एखाद्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा काही वर्षांपूर्वीचा फोटो शोधून त्यावर यमक जुळवणाऱ्या भन्नाट कमेंट केल्या जात आहेत. भारतामध्ये फेसबुक मोठ्या प्रमाणात वापरण्यास सुरुवात होऊन दहा वर्षांचा कालावधी उलटला आहे. त्यामुळेच अगदी पाच वर्षांपासून ते आठ ते दहा वर्षांपूर्वीचे फोटो शोधून शोधून त्यावर अनेकजण कमेंट करत आहेत. त्यामुळे अनेकांचे जुने फोटो आता टाइमलाइनवर अचानक झळकू लागले आहेत. अचानक हे फोटो चर्चेत आल्याने ज्या मित्राला किंवा मैत्रिणींना टार्गेट केलं जात आहे ते लोकं हे फोटो डिलीट करत आहेत किंवा कमेंट डिसेबल करत आहेत. काहीजण या शेरेजाबीची मज्जा घेताना दिसत आहेत.