14 October 2019

News Flash

आदित्य पांचोलीच्या अडचणीत वाढ; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बहिणीकडून तक्रार दाखल

एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीकडून ई-मेलच्या माध्यमातून तक्रार आल्यानंतर अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

आदित्य पांचोली

एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीकडून ई-मेलच्या माध्यमातून तक्रार आल्यानंतर अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आदित्य पांचोलीविरोधात मारहाण आणि शोषणाची तक्रार दाखल केली गेली. ही घटना अभिनेत्रीच्या करिअरच्या सुरुवातीला म्हणजेच जवळपास १० वर्षांपूर्वी घडल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

याप्रकरणी ‘मिड डे’ या वृत्तपत्राशी बोलताना आदित्यने सांगितले, ‘अभिनेत्रीच्या वकीलाने माझ्याविरोधात बलात्काराचे खोटे प्रकरण दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे मी अभिनेत्रीविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.’ पोलिसांनी रविवारी आदित्य पांचोलीचा जबाब नोंदवून घेतला आहे.

‘ई-मेलद्वारे तक्रार मिळाल्यानंतर संबंधित अभिनेत्रीशी आम्ही संपर्क केला. ही घटना १२ वर्षांपूर्वींची असल्याने एफआयआर दाखल करण्यासाठी आम्हाला पुरावे गोळा करावे लागतील. आदित्य पांचोलीच्या पत्नीला संबंधित घटनेबद्दल ठाऊक होतं, असं तक्रारीत म्हटलं आहे,’ अशी माहिती पोलिसांनी दिली.

आदित्य पांचोली म्हणाला, ‘संबंधित अभिनेत्रीविरोधात मी आधीच अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अभिनेत्रीच्या वकिलांनी ६ जानेवारी रोजी माझ्याविरोधात बलात्काराचे खोटे प्रकरण दाखल करण्याची धमकी दिली होती. अब्रुनुकसानीचा दावा मागे घ्यावा यासाठी त्याने ही धमकी दिली होती. त्याचा व्हिडिओ मी रेकॉर्ड केला होता. हे पुरावे मी पोलिसांना आणि कोर्टात दिले आहेत. माझ्याविरोधात हा कट रचण्यात येत आहे.’

दोन्ही बाजूंची सखोल चौकशी केल्यानंतर, जबाब नोंदवून घेतल्यानंतर पुढील कारवाई करू अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

First Published on May 15, 2019 1:09 pm

Web Title: complaint of assault and exploitation filed against the aditya pancholi