गुजरात, आसाम यासह अनेक राज्यात त्यांच्या भाषेतील चित्रपटांना प्राधान्य दिले जाते. त्यांची भाषा ते जपतात. आपण पण आपली भाषा टिकवण्यासाठी पुढे आले पाहिजे. तसे झाले नाही तर महाराष्ट्रात मराठी चित्रपट दिसणारच नाही. मराठी भाषा टिकवणे ही आपली जबाबदारी असून प्रत्येकाने मराठीमध्ये संवाद साधला पाहिजे, अशी भूमिका अभिनेता सुबोध भावे याने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कलाकार कट्ट्यात मांडली.

यावेळी सुबोध म्हणाला की, प्रत्येकाने मराठी भाषेत संवाद साधला पाहिजे. मीसुद्धा प्रत्येक ठिकाणी मराठीमध्ये बोलतो. मराठी शाळा बंद पडायला साहित्यिक, लेखक जबाबदार नसून आपल्या भाषेविषयी जो न्यूनगंड तयार झाला आहे तो जबाबदार आहे. दक्षिणेकडेचा प्रेक्षक हा अभिमानी आहे. प्रत्येक सिनेमा हा चित्रपगृहामध्ये जाऊन पाहतो. त्यांना ज्या प्रकारे सर्व ठिकाणावरील प्रेक्षक लाभला आहे. तसा आपल्याला प्रेक्षक लाभला नाही. अशा शब्दात त्याने सिनेसृष्टीची खंत व्यक्त केली.

यावेळी त्याने विद्यार्थ्यांना अपयश आले म्हणून आत्महत्या करण्यापेक्षा त्याचा आनंद साजरा करण्याचा सल्ला दिला. एखाद्या परीक्षेत यश मिळाल्यावर आपण ज्यापद्धतीने साजरे करतो अपयशही तसेच साजरे केल गेले पाहिजे, असे आवाहन त्याने यावेळी केले.
‘समाजातील प्रत्येकानेच आपण काय करत आहोत याचा विचार करण्याची गरज आहे. मुळात गुणांवरून एखाद्याचे आयुष्य ठरवणे ही मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे परीक्षेत पास झाल्यावर त्यांचा आंनद साजरा करतो. त्याचप्रमाणे जीवनात अपयश आल्यावरदेखील तेवढ्या प्रमाणात आंनद साजरा करा,’ असे आवाहन विद्यार्थी वर्गाला त्याने केले.