छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट साऱ्यांनाच ठावूक आहे. या चित्रपटातील कथानकासोबतच त्यातील गाणीदेखील तितकीच गाजली. विशेष म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीला एकाहून एक सरस गाणी देणारा संगीतकार देवदत्त मनिषा बाजी एक नवी गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘मोरे पिया’ असं देवदत्तच्या गाण्याचे बोल असून पाश्चात्य इलेकट्रॉनिका व चिलस्टेप लाउंज प्रकारात हे गाणं सादर केलं आहे. विशेष म्हणजे आपल्या अप्रतिम सतार वादनाने अवघ्या जगभरात नाव कमावलेले असद खान यांनी देवदत्तच्या ‘मोरे पिया’ मध्ये देखील आपल्या सतार वादनाचे योगदान दिले आहे.

महाराष्ट्रीय लोकसंगीतासाठी नावाजलेल्या देवदत्तने या गाण्यातून पारंपरिक व पाश्चात्य प्रकारांचा सुरेख मेळ साधला आहे. या गाण्याला दाक्षिणात्य सिनेमांनाही आपल्या आवाजाने भुरळ घालणारी गायिका आनंदी जोशी हिचा आवाज लाभला आहे. या गाण्याची निर्मिती व शब्दरचना देवदत्तची असून ब्रज भाषेतल्या ओळी श्रुती कुलकर्णी हिने लिहिल्या आहेत.

असद खान व आनंदी जोशी यांच्याबरोबर गाणं करायला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर निरनिराळे जॉनर सादर करण्याचा माझा प्रयत्न या गाण्यामुळे साध्य होत आहे,’असं देवदत्त म्हणाला.