विमानाची तिकिटे, पर्यायी संपर्क क्रमांक सादर करण्याचे आदेश

अश्लील गाणे गायल्या प्रकरणी अडचणीत सापडलेला प्रसिद्ध गायक हनी सिंग याने विदेशात जाण्याकरिता परवानगी मिळावी म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.एफ. सय्यद यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने सर्व पक्षांची  बाजू ऐकल्यानंतर हनी सिंगला थायलंडला जाण्याची परवानगी दिली असून त्यापूर्वी विमानाची तिकिटे, थायलंडमध्ये थांबण्याचे ठिकाण, पर्यायी मोबाईल क्रमांक सादर करावे तसेच भारतात परतताच ६ फेब्रुवारीला न्यायालयाला कळवावे, असे आदेश दिले.

हनी सिंग आणि संगीतकार बादशहा यांच्याविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये कारवाई करावी, अशा आशयाची याचिका आनंदपालसिंग जब्बल यांनी दाखल केली होती. याप्रकरणी सत्र न्यायालयाने त्याला विदेशात जाण्याकरिता पूर्वपरवानगी घेण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता. आता पुन्हा त्याने दिलेल्या अटीनुसार कोर्टाला विदेशात जाण्याची परवानगी मागितली आहे. २१ जानेवारीला त्याला कार्यक्रमाकरिता थायलंडला जायचे होते.

पण, न्यायालयाची परवानगी न मिळाल्यामुळे तो वेळेत थायलंडला जाऊ शकला नाही. दरम्यान, ५ ते १० फेब्रुवारी या काळात त्याचा दुबई येथे तर १ ते ३१ मार्च या काळात आस्ट्रेलिया येथे कार्यक्रम आहे. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने थायलंड दौऱ्यासाठी सशर्त परवानगी दिली.

उर्वरित दौऱ्यासंदर्भात कोणताच निर्णय दिला नाही. हनी सिंगतर्फे अ‍ॅड. अतुल पांडे, अ‍ॅड. आशीष किल्लेदार, सरकारतर्फे अ‍ॅड. नितीन तेलगोटे आणि तक्रारदारातर्फे अ‍ॅड. रसपालसिंग रेणू यांनी बाजू मांडली.