07 April 2020

News Flash

स्वमग्नतेची सेल्फी

मोबाइल फोननं माणसाच्या आयुष्यात जणू क्रांतीच घडून आलीय.

मोबाइल फोननं माणसाच्या आयुष्यात जणू क्रांतीच घडून आलीय. यापुढच्या काळात तर त्याचं अवघं अस्तित्वच त्यावर अवलंबून राहील अशी तजवीज करण्याचे यत्न सुरू आहेत. आणि ते दोनशे टक्के यशस्वी होणार यात शंका नाही. मोबाइलनं अनेक मनुष्योपयोगी यंत्रं आणि उपकरणांची छुट्टी करून टाकलीय. आपले कष्ट कमी करणारी सतराशे साठ यंत्रं व उपकरणं घेण्यापेक्षा एकातच त्या साऱ्या सुविधा उपलब्ध झाल्या तर ते बरंच. नाही का? मोबाइलनं आज दिवसाचे २४ तास माणसं परस्परांशी जोडलेली राहू लागलीयत. अर्थात त्याचे बरे-वाईट परिणामही हळूहळू जाणवू लागलेत. या गॅझेटच्या नादी लागून ज्या गोष्टी पूर्वी अत्यंत ‘खासगी’ समजल्या जात, त्या आता चक्क ‘सार्वजनिक’ होऊ लागल्यात. प्रत्येक क्षणी जगाशी ‘कनेक्ट’ राहण्याच्या हव्यासापायी माणसाचं खासगीपणच संपुष्टात आलंय. व्हॉट्स अ‍ॅपवर प्रत्येक गोष्ट ‘शेअर’ करण्याच्या अट्टहासानं ‘सेल्फी’ नावाचं नवं फॅड सर्वदूर फोफावलंय. हे ‘सेल्फी’ प्रकरण म्हणजे आजच्या व्यक्तिकेंद्री जगण्याचं.. नार्सिसस शैलीतल्या आत्ममग्नतेचंच प्रतीक. बरं, त्याद्वारे अपलोड होणारे फोटो त्या व्यक्तीचं उत्तम तेच लोकांपुढं पेश करतात असंही नाही. बहुतांशी सेल्फी हे वेडेवाकडे, काहीसे विरूप आणि न ‘बघणेबल’ असतात. तरीही सेल्फीचं या पिढीला वेड लागलंय. आपलं असं विपर्यस्त रूप लोकांसमोर जाणं कितपत योग्य, याचं तारतम्यही कुणाला राहिलेलं नाही. साहजिकच ‘सेल्फी’ या नावाचं नाटक रंगभूमीवर आल्यावर त्याच्या प्रयोजनाबद्दल कुतूहल वाटणं स्वाभाविकच. अर्थात नाटक पाहिल्यावर त्यातला आशय ‘सेल्फी’शी सुसंगत असल्याचं मनोमन पटतं.

एका आडगावातल्या रेल्वे स्टेशनवरच्या महिला प्रतीक्षागृहात रात्रीच्या वेळी गाडी येईतो वेळ काढण्यासाठी आलेल्या पाच स्त्रियांच्या परस्परसंवादातून हे नाटक आकारास येतं. त्यांच्या गप्पांतून त्यांची पाश्र्वभूमी, त्यांचं जगणं आणि त्यातले ताण कळत जातात. आणि त्यातून एक व्यापक जीवनानुभव पेश होतो. स्वाती कवठेकर या पेशानं नर्स असलेल्या आणि सगळं काही परफेक्टच असायला हवं, या अट्टहासानं सदासर्वकाळ इतरांना उपदेशाचे डोस पाजणाऱ्या महिला. त्यांची भोचक जीभ प्रत्येक विषयावर समोरच्याची कसली पत्रास न ठेवता धारदार करवतीसारखी सतत चालत असते. तनुजा शर्मा ही वरकरणी तरी टिप्पिकल अशी गृहिणी. डेली सोप्स आणि गॉसिपिंगमध्ये रमणारी. तर विभावरी एका मान्यवर कॉलेजमध्ये इंग्रजीची प्राध्यापिका. शाल्मली प्रधान ही नाटक-सिनेमा-मालिका विश्वातली एक ग्लॅमरस अभिनेत्री. तर मीनाक्षी ही एका कॉर्पोरेट कंपनीत मोठय़ा हुद्दय़ावर असलेली पस्तिशीची स्त्री. एकमेकींची जुजबी ओळख करून घेता घेता या साऱ्याजणी कळत-नकळत परस्परांच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावू लागतात आणि त्यातून त्यांच्या आयुष्यातले गुंते हळूहळू समोर येत जातात, हा ‘सेल्फी’ या नाटकाचा मध्यवर्ती गाभा. सहसा अनोळखी माणसासमोर कुणी आपल्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल बोलत नाही. परंतु का कुणास ठाऊक, रेल्वे स्टेशनातल्या या प्रतीक्षागृहात काही क्षणांसाठी आश्रयाला आलेल्या या पाचही जणी सुरुवातीला काहीशा साशंकतेनं, नाइलाजानं आणि नंतर आपल्याबद्दलच्या गैरसमजावर खुलासा करण्याच्या गरजेतून एकमेकींपाशी हळूहळू मोकळ्या होत जातात. आपल्या व्यक्तिगत आयुष्यातल्या ताणाबद्दल स्वत:चं मन मोकळं करतात. याचं कारण बहुधा प्रत्येकीला ही खात्री असते, की हे बोलणं, ही ओळख आणि हे शेअरिंग इथंच संपून जाणार आहे. नंतर आपापले मार्ग वेगळे असणार आहेत. पुढे आयुष्याच्या एखाद्या वळणावर आपण परस्परांना भेटण्याची शक्यताही अशक्यकोटीतली. मग आपलं मन या क्षणापुरतं अनोळखी व्यक्तीसमोर मोकळं करायला काय हरकत आहे? हे बोलणं म्हणजे ‘रात गई सो बात गई’! त्याला तितपतच महत्त्व.
पण हे खरं असतं का?
त्या काही क्षणांत आपल्या आयुष्यातले गुंते नाइलाजानं परस्परांना सांगून त्या साऱ्याजणी आपलं मन हलकं करतात खरं; पण या संवादातूनच त्यांना ते गुंते कसे सोडवायचे याचा मार्ग सापडतो.. प्रत्येकीची स्वत:शी नव्यानं ओळख होते.
‘सावल्या’या एकेकाळी गाजलेल्या नाटकात काम करणाऱ्या अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी हे नाटक लिहिलं आहे. साहजिकच त्याचा प्रभाव त्यांच्या या नाटकात जाणवतो. नव्वदच्या दशकात ‘चारचौघी’त आणि अगदी अलीकडे ‘ठष्ट’सारख्या नाटकातून स्त्री-समस्यांचा वेध घेतला गेला आहे. त्याच प्रकारे शिल्पा नवलकर यांनीही ‘सेल्फी’त स्त्री-समस्यांचा धांडोळा घेतला आहे. मात्र, आज एकूणच काळानं अन् स्त्रियांनीदेखील घेतलेली प्रचंड झेप पाहता या नाटकात त्यांच्या ज्या समस्या ज्या तऱ्हेनं आणि ज्या तीव्रतेनं दाखवल्या गेल्या आहेत, तेवढय़ा मुळात त्या गंभीर आहेत का, असा प्रश्न पडतो. उदाहरणार्थ, यातली प्राध्यापिका असलेली, स्वत:चे काहीएक विचार बाळगणारी विभावरीसारखी स्त्री केवळ नवरा म्हणतो म्हणून आपल्याला मूल होऊ न देण्याचा विचार त्याच्यावरील अंध श्रद्धेनं कशी काय स्वीकारू शकते? तीच गोष्ट मीनाक्षीची. तिला लग्न नकोय; पण प्रेम हवंय.. शरीरसुख हवंय. ते मिळवण्यात आजच्या काळात काय अडचण आहे? त्यातून प्रेम न मिळेल कदाचित; पण शरीरसुख ती नक्कीच मिळवू शकते. ते मिळवण्यातही तिला जर नैतिक-अनैतिक असले पेच पडत असतील तर मग तिची बंडखोरी नेमकी आहे तरी कशाविरुद्ध? ‘स्त्रीनं आपल्याला हवं तसं जगावं..’ असं ती एकीकडे म्हणते आणि दुसरीकडे विराज या तिच्याकडे आकर्षित झालेल्या तरुणाला तो केवळ आपल्यापेक्षा वयानं लहान आहे म्हणून ती जवळ करू इच्छित नाही, हा विरोधाभास अतक्र्य आहे. तिला भेडसावणारं जीवघेणं एकटेपण म्हणूनच सहानुभूतीस पात्र ठरत नाही. तनुजाला तर नेमकं काय हवंय, हे तिचं तिलाही कळलेलं नाही. ‘प्रत्येक नात्याला एक्स्पायरी डेट असते,’ म्हणत ती नित्य नव्या पुरुषासोबत आपलं सुख शोधू पाहते. आणि यात तिला काहीही गैर वाटत नाही. परंतु तिची ही तहान कधीही न शमणारी आहे. त्यातून अखेरीस वैफल्याशिवाय काही हाती लागणं शक्य नाही. शाल्मलीची त्यातल्या त्यात पटेल अशी कहाणी आहे. तिला आपल्याभोवतीचं प्रसिद्धीचं वलय गमावण्याची भीती घेरून राहिलीय. लग्न झालेल्या स्त्रीला प्रेक्षक स्वीकारत नाहीत, हा तिचा समज अगदीच गैर आहे असं नाही. त्यासाठी ती आपलं लग्न आणि आता आपलं गरोदरपण कसोशीनं लपवू बघतेय. नवऱ्याला मूल हवं असूनही तिला मात्र ते नकोय. तिच्या करीअरआड येऊ घातलेल्या मुलाचा बळी देण्यात तिला आपण काही गैर करतोय असं वाटत नाही. कलेच्या क्षेत्रातल्या स्त्री-कलाकारांना कायम भेडसावणारी ही समस्या. त्यातून ज्यानं त्यानं आपापली निवड करायची असते. इथं शाल्मली आपल्या करीअरच्या बाजूनं उभी ठाकलेय. प्रतीक्षागृहातल्या इतरजणींना मात्र ते चुकीचं वाटतंय. त्याची कारणंही अर्थात सर्वश्रृत आहेत. मूल होण्याचं निघून जाणारं वय, आयुष्यातले प्राधान्यक्रम ठरवण्यातली गल्लत.. वगैरे वगैरे. स्वातीबाईंची समस्या ही प्रतीक्षागृहात गाडीची वाट पाहत असताना अचानक उद्भवलेली. त्यांच्या नवऱ्यानं आपल्या मुलांसह कायमसाठी इंग्लंडला जायचं ठरवलंय.. स्वातीबाईंना एकटीला इथंच सोडून! याचं कारण : घरातल्यांना सतत जखमी करणारी त्यांची धारदार जीभ! आपण आपल्याच माणसांना इतके नकोसे झालोय, हे स्वातीबाईंना प्रथमच कळतं. हा धक्का त्यांच्यासाठी न पचणारा असतो. शाल्मली आणि स्वाती कवठेकर यांच्या समस्या त्यातल्या त्यात खऱ्या म्हणता येतील अशा. इतरांच्या समस्या मात्र आजच्या काळात तशा कमी संभवनीय. असं असलं तरी अशक्य मात्र खचितच नाहीत.
शिल्पा नवलकर यांचं हे पहिलंच नाटक आहे हे खरं वाटू नये इतक्या सफाईनं त्यांनी ते लिहिलं आहे. चर्चानाटय़ हाताळणं सोपं नाही. नाटय़तंत्रावरील त्यांची हुकुमत त्यातून सिद्ध होते. तथापि शेवटच्या प्रवेशात स्वातीबाईंचं साक्षात्कारी स्वगत नसतं तर बरं झालं असतं. त्यानं नाटकाला ढोबळता येते. काही गोष्टी मुग्ध राहण्यात तरलता असते. यातल्या पाचही स्त्रियांना आपलं असं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व देण्यात लेखिका म्हणून त्या यशस्वी ठरल्या आहेत. यापुढच्या काळात त्यांच्याकडून लेखिका म्हणून अधिक अपेक्षा करावी असं हे दमदार पदार्पण आहे.
दिग्दर्शक अजित भुरे यांनी ‘सेल्फी’मध्ये संवाद हेच माध्यम आपल्या हाताशी आहे, ही खुणगाठ बांधून उच्चारित शब्दांच्या आरोह-अवरोहावर, त्यातल्या आघातांवर, विरामस्थानांवर उत्तम काम केलं आहे; ज्यामुळे नाटकातला आशय उठावदार आणि अधिक प्रभावी झाला आहे. प्रत्येक पात्राचं व्यक्तिमत्त्व आणि प्रत्येकीच्या समस्येनुरूप त्यांनी त्यांना लीलया हाताळलं आहे.
प्रदीप मुळ्ये यांचं रेल्वेस्टेशनातील प्रतीक्षागृहाचं वास्तवदर्शी नेपथ्य आणि नाटय़ांतर्गत ताण गहिरे करणाऱ्या प्रकाशयोजनेनं नाटकाच्या यशात मोलाची भूमिका बजावली आहे. परीक्षित भातखंडे यांनी पाश्र्वसंगीतातून त्यांना सुयोग्य साथ केली आहे. शरद सावंत (रंगभूषा) आणि उर्वशी ठाकरे-मिताली बोरुडे (वेशभूषा) यांनी पात्रांना ‘व्यक्तिमत्त्व’ बहाल केलं आहे.
सुकन्या कुलकर्णी (स्वाती कवठेकर), शिल्पा नवलकर (तनुजा), सोनाली पंडित (प्रा. विभावरी), पूर्वा गोखले (शाल्मली) आणि ऋजुता देशमुख (मीनाक्षी) या सर्वानीच आपापल्या भूमिकांना सर्वार्थानं न्याय दिला आहे. उच्चारित शब्दांचं महत्त्व जाणून या प्रत्येकीनं त्यातला उच्चारित आणि अनुच्चारित भावार्थ प्रेक्षकांपर्यंत पोचवला आहे. या सर्वाच्या कामांचं स्वतंत्र विश्लेषण करता येणार नाही, इतकं त्यांचं छान एकजीव रसायन जमलं आहे. नाटकाला उंची प्राप्त करून देण्यात या लमाणांचा सिंहाचा वाटा आहे, हे नि:संशय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2015 5:46 am

Web Title: critics on selfie drama
Next Stories
1 एक चावट लाट
2 ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ 
3 शाहरूख म्हणतो.. आता काहीतरी हटके करायचंय!
Just Now!
X