‘सैराट’ चित्रपटातून रातोरात लोकप्रिय झालेल्या रिंकू राजगुरू म्हणजेच ‘आर्ची’ला पाहण्यासाठी चाहत्यांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली आहे. रिंकू ही टेंभूर्णी येथील एका परीक्षा केंद्रातून बारावीची परीक्षा देत आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी सकाळपासूनच चाहत्यांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती.

तिची लोकप्रियता आणि तिला पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता महाविद्यालयानं पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली होती. ती जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून परीक्षा देत आहे. तिला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होईल हे ठावूक असल्यानं कॉलेजच्या प्राचार्या जयश्री गवळी-सातपुते यांनी टेंभूर्णी पोलीस ठाण्यात पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली होती.

आर्चीच्या चाहत्यांमुळे इतर विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये ही प्राचार्यांची इच्छा होती. पोलीस बंदोबस्तामुळे इतर विद्यार्थ्यांना अर्चीच्या चाहत्यांचा कोणताही त्रास झाला नसल्याचं समजत आहे. आजपासून बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. रिंकू कला शाखेतून बारावीची परीक्षा देत आहे.