सुहास जोशी

राणीच्या राजवाडय़ाची भव्यदिव्यता, राजघराण्याच्या रीतीरिवाजातील औपचारिकता, त्यातील अपरिहार्यता, चाकोरी तोडण्याचा प्रयत्न, जगातील इतर घडामोडींचे परिणाम असे सारे काही पहिल्या दोन सीझनमध्ये पाहिल्यानंतर राजघराण्याशी निगडित असलेल्या ‘क्राऊन’ या मेगा मालिकेच्या तिसऱ्या सीझनमध्ये काय असेल ही उत्सुकता कोणत्याही प्रेक्षकाला हमखास असू शकते. त्या विषयाबद्दल प्रेम असणारे चाहते हा भाग वगळला तर त्यातून नवीन काय मिळणार?, असा प्रश्न अगदीच साहजिक आहे. किंबहुना तो पडला नाही तर ही सीरिज म्हणजे राजघराण्याच्या औपचारिकतेसारखाच एक भाग होऊन जाईल. या सर्व मुद्दय़ांना उत्तर देणारे असे काही तरी मांडण्याचे आव्हान ‘क्राऊन ’ वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनसमोर होते. त्यामध्ये सीरिजकर्ते काही प्रमाणात यशस्वी झाले. मुळातच अनेक घटकांच्या मर्यादित चौकटीत हे सारे काम करायचे, त्यात पुन्हा सत्य घटनांचा अपलाप करणे कठीणच, तरीदेखील प्रेक्षकांना खिळवून ठेवताना थोडीशी दमछाक झाली आहे, पण शेवटच्या टप्प्यात मालिका बऱ्यापैकी सावरते.

एलिझाबेथ (द्वितीय) राणीच्या लग्नापासून (१९४७) आणि नंतर राज्यारोहणापासून सुरू झालेला तिचा प्रवास ‘क्राऊन’ या वेबसीरिजमध्ये येतो. पहिल्या दोन सीझनमध्ये तिच्या राज्यारोहणापासून ते राजपुत्र एडवर्डच्या जन्मापर्यंतचा (१९६४) कालावधी येतो, तर तिसरा सीझन राज्यारोहणाच्या पंचविसाव्या वर्षांपर्यंत (१९७७) येऊन थांबतो. तिसऱ्या सीझनमध्ये अजूनही कार्यरत असलेली राणी वयाने ज्येष्ठ झाली आहे. तिचा भोवताल विशेषत: तिची मुलं मोठी झाली आहेत. तर दुसरीकडे जगामध्ये युनायटेड किंगडमच्या बाहेर असंख्य घडामोडी होत आहेत. त्याचे परिणाम कमी-अधिक प्रमाणात देशावरही होत आहेत. अशा वेळी राणीचा प्रवास तिच्या राज्यारोहणाच्या पंचविसाव्या वर्षांपर्यंत पोहोचताना या सीझनमध्ये दिसतो.

वयोमानानुसार येणारा थोडासा कडवट आणि रूढीवादी स्वभाव, त्याच वेळी नव्या पिढीतील बदल, राजकारणात सुरू असलेली उलथापालथ असे बरेच काही यात येते. राजपुत्राच्या निमित्ताने राजवाडय़ाबाहेरदेखील बरेच काही घडते. बहीण मार्गारेटमुळे कथानकाला कलाटणी मिळते. किंबहुना, या सीझनमध्ये सारा भर हा सभोवतालच्या पात्रांवर अधिक आहे. एखाद्या ठरावीक घटनेभोवतीच एखादा भाग फिरत राहतो. त्या घटनांचा परिणाम राणीवर पडत असला तरी अंतिमत: सारा भर हा त्या दुसऱ्या पात्रावर अधिक आहे.

राजपुत्र चार्ल्स आणि त्याचा वेल्स प्रांतातील प्रवास, पती फिलिप आणि चांद्रयान मोहीम, बहीण मार्गारेट – तिचा अमेरिका दौरा आणि विवाहब’ा प्रकरण, हॅरॉल्ड विल्सन यांची दुहेरी पंतप्रधान पदाची कारकीर्द यांच्याशी निगडित कथानक असे काही स्वतंत्र भागच यामध्ये दिसतात. कथानकातील बदल हा काही अंशी फायदेशीर ठरतो. कारण पहिल्या दोन्ही सीझनमधून राणी, राजघराणे आणि त्याची भव्यदिव्यता व रीतीरिवाज हे प्रेक्षकांनी अनुभवले आहे. तिसऱ्या सीझनमध्ये त्यापलीकडे जाण्याचा स्तुत्य प्रयत्न झाला आहे. ही या सीझनची जमेची बाजू.

या सीझनमध्ये या इतरांचे भावविश्व मांडताना सीरिजकर्त्यांनी अनेक मुद्दय़ांना हात घातला असला तरी या सगळ्याच्या मध्यवर्ती असलेली राणी आणि मुकुट हा भाग समांतरपणे उत्तम रीतीने रेखाटला आहे. मुख्यत: राणीच्या वयानुसार तिच्यामध्ये आलेला कोरडेपणा, रीतीरिवाजातून ठसलेला कडवटपणा यात प्रभावीपणे दिसून येतो. त्यात औपचारिकतेतून होणाऱ्या घटनांवरदेखील भर आहे.  मुकुटातील घुसमट पहिल्या सीझनमध्ये जाणवली, तर त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न दुसऱ्या सीझनमध्ये. तिसऱ्या सीझनमध्ये या सर्वाला सरावलेली आणि त्याच वेळी तिच्या भोवतालच्या घटकांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे काहीशी अस्वस्थ आणि त्याच वेळी ठाम असलेली राणी दिसून येते. हे सारे कंगोरे, बारकावे येथे अगदी स्पष्टपणे दिसतात. ठामपणातून तिने घेतलेले निर्णय हे कधी कधी रीतीरिवाजाला बाजूला सारणारे आहेत हेदेखील महत्त्वाचे. तरीदेखील मुकुटाशी जोडले गेलेले द्वंद्व अगदी शेवटच्या भागापर्यंत जाणवते.

पहिल्या दोन्ही सीझनमध्ये राजवाडय़ाची आणि त्याचबरोबर इतर वास्तूंची असलेली भव्यता येथेदेखील टिकवून ठेवली आहे. त्यावर विशेष काही लिहायची गरज नाही. तिसऱ्या सीझनमध्ये काही वेळा मनोवैज्ञानिक आणि भावनिक घटनांवर अगदी ठोसपणे भर दिला आहे. विशेषत: अमेरिकेच्या चांद्रयान मोहिमेच्या वेळी राणीच्या पतीची अस्वस्थता, राजपुत्र चार्ल्सचे वेल्स प्रांतातील आणि नौदलातील प्रशिक्षण आणि मार्गारेटच्या आयुष्यातील बदल. हे तीनही घटक या मालिकेत शीर्षस्थानी आहेत. जगात काय सुरू आहे आणि त्याच वेळी आपण कोठे आहोत अशी द्विधा मन:स्थिती मांडण्याचा प्रयत्न या पती फिलिपशी संबंधित भागातून झाला आहे. तर चाकोरी तोडण्याच्या दिशेने होत असलेला राजपुत्राचा प्रवास हे सारे क्राऊनची भावी वाटचाल रेखाटतात.

वयोमानानुसार कलाकारांमध्ये बदल केला आहे. तो केवळ उचितच नाही तर चांगलाच प्रभावीदेखील ठरतो. चित्रीकरण स्थळांमधील बदल अगदीच मर्यादित आहे, पण त्याला पर्याय नाही. त्यामुळे कॅमेऱ्यातून दिसणाऱ्या घटकांना आधीच्या सीझनपेक्षा काहीशा मर्यादा पडतात. कॅमेऱ्यातून प्रभाव टाकणारी दृश्यं अगदीच मर्यादित आहेत. सारा भर हा कथानकावरच आहे. दुसरीकडे घटनांच्या सत्यतेबाबत काही प्रमाणात टीका झाली, विशेषत: राणीची बहीण मार्गारेटाच्या अमेरिकेतील शिष्टाई प्रसंगाबाबत काही आक्षेप आले, पण त्यामुळे कथेच्या प्रवाहाला, गाभ्याला फारसा धक्का लागत नाही हे महत्त्वाचे. असे बदल एक कथानक म्हणून फारसे नुकसानकारक ठरत नाहीत.

एखाद्या कथानकाच्या प्रेमात पडून त्यातील सर्व घटनांचा आनंद घेणाऱ्यांच्या दृष्टीने हा सीझन नक्कीच त्यांच्या कसोटीवर उतरणारा आहे, पण नव्याने पाहणाऱ्यास थोडे अडखळायला होऊ  शकते. हे अडखळणे कमी करण्याचा प्रयत्न झाला आहे, पण आणखीन थोडा अधिक प्रयत्न झाला असता तर हा सीझन आणखीन प्रभावी ठरला असता.

क्राऊन

सीझन – तिसरा

ऑनलाइन अ‍ॅप – नेटफ्लिक्स