|| पंकज भोसले

चार भिंतीतला थरार ही संकल्पना भीती आणि थरारपटांनी सातत्याने वापरून ओळखीची केली आहे. म्हणजे अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये एकदा दोन-चार किंवा सहा अतिस्मार्ट (यातल्या प्रत्येकाच्या नजरेत इतर अतिमाठ) व्यक्तिरेखांना चार भिंतींमध्ये कोंडून त्यांना कुणा अज्ञात ठिकाणावरून आज्ञावली येते. त्यानंतर मृत्यूशी लढण्यासाठी कित्येक प्रकारचे खेळ उपलब्ध करून दिले जातात. बऱ्यापैकी दृष्ट किंवाकमकुमवत मनांच्या व्यक्तिरेखा आपापल्या चुकीने खेळात पराभूत होत प्राण गमावतात. सर्वगुणसंपन्न खेळाडू आणि स्त्री व्यक्तिरेखा ज्याच्या जवळपास घुटमळते, त्याचा विजयरथ कुणीही थांबू शकत नाही.

बऱ्याच ओळखीच्या वाटा असतानाही चार भिंतीतीतील थरार घडविण्याच्या नवनव्या क्लृप्त्या चित्रकर्ते शोधत असतात. जोएल शूमाकर या दिग्दर्शकाने ‘फोन बूथ’(२००२) चित्रपटामध्ये एका टेलिफोन बूथच्या पारदर्शक भिंतीमध्ये दीड तास जगण्या-मरण्याचा खेळ रंगविला होता, मनोज नाईट श्यामलनने ‘डेव्हिल’ (२०१०) या चित्रपटात एका इमारतीमधील अडकलेल्या लिफ्टच्या चार भिंतींत मृत्युखेळ चालविला होता.

व्हिन्सेन्झो नताली या कॅनेडियन दिग्दर्शकाने ‘क्यूब’ या चित्रपटामध्ये चार भिंतीचे अनेक मृत्युसापळे रचत अतिस्मार्ट माणसे या जगात राहण्यास लायक नाहीत, हा सिद्धांतही मांडला होता. याच महिन्यात आलेला ‘रॅपिड आय मूव्हमेण्ट’ या चित्रप्रकारातील पारंपरिक साचेबद्धता टाळण्यासाठी जोमाने कार्यरत राहिलेला दिसतो. न्यू यॉर्क शहरातील जगप्रसिद्ध टाइम्स चौकामध्ये उभारलेल्या बूथमध्ये येथील सारे कथानक घडते.

‘रॅपिड आय मूव्हमेण्ट’ ही आपल्या निद्रेचा २० टक्के भाग व्यापणारी अवस्था आहे. मेंदू जागृतावस्थेपेक्षा दीड-दोन पटीत कार्यरत राहून ही झोप घेतली जाते. आधुनिक शास्त्रात १९५७ साली लागलेल्या या झोपेबाबतच्या संशोधनातून निद्राशास्त्रामध्ये प्रचंड मोठी भर पडली आहे. डोळे उघडे ठेवून लख्ख जागी वाटणारी व्यक्ती या काळात स्वप्ने पाहू शकते. चिंता, ताणाच्या आणि झोप अडवून ठेवण्याच्या परिस्थितीत प्रत्येकाला या निद्रावस्थेला सामोरे जावे लागते. दिग्दर्शक पीटर बिशाय यांनी निद्राशास्त्रातील या संकल्पनेचा वापर चार भिंतींतील आपल्या थरारपटासाठी वापरला आहे.

चित्रपटाचा नायक आहे रिक वायडर (फ्रान्स्वा आर्नो) नावाचा अतिशय जनप्रिय रेडिओ जॉकी. आपल्या प्रत्येक कार्यक्रमाच्या आरंभी ‘गुडमॉर्निग न्यू यॉर्क’ (अमिन सयानी यांच्या प्रत्यक्षातल्या ‘नमष्कार बहिनी और भाईओ’ ते  विद्या बालन हिच्या पडद्यापुरत्या ‘गुडमॉर्निग मुंबई’पेक्षा अधिक लोकप्रिय) ही त्याची श्रोत्यांना घातलेली साद सुपरिचित असते. प्रयोगशील संगीताला रेडिओवर सादर करून अफाट श्रोतृवर्ग मिळविणारा रिक वायडर आत्मलट्टू आणि लक्ष वेधण्यासाठी वाटेल त्या गोष्टी करण्यात पटाईत असतो. आपल्या छबीचा आणखी उदोउदो व्हावा यासाठी कोणती लक्षवेधी कृती करावी, या शोधात त्याला झोप अडवून ठेवण्याचा विक्रम करण्याची हुक्की येते. मग कारण म्हणून एखाद्या आजाराच्या संशोधनासाठी निधी जमविण्याचा खटाटोप केला जातो. दुर्धर आजार कोणते याची चाचपणी करून ११ दिवस सतत जागरण करण्याचा आधीचा विक्रम मोडण्याचा यत्न रिककडून घोषित केला जातो.

टाइम स्क्वेअरवर एक बूथ उभारून आजाराच्या संशोधनासाठी लोकांना निधी देण्याचे आवाहन केले जाते. दोन-चार दिवसांत निधी जमविण्याच्या घोषणेपुरते जनतेचे पुरेसे लक्ष वेधून झाल्यानंतर निद्राविरोधाचा हा पण संपवायचा, यावर रिक ठाम असतो. मात्र निद्रा उपवास सुरू केल्यानंतर गोष्टी त्याच्या हातात राहात नाहीत. चित्रपटाच्या आरंभी दाखविलेल्या एका डॉक्टरचा रहस्यमयी खून करणारी व्यक्ती रिकला संपर्क करते. पन् नास लाख डॉलर इतका निधी संशोधनासाठी जमेस्तोवर झोप लागली, तर तुझी हत्या करण्यात येईल, अशी धमकी त्याला दिली जाते. धमकीची तीव्रता जाणवून देण्यासाठी संवाद सुरू असतानाच त्याच्यासमोर एका व्यक्तीला ठार मारण्यात येते.

लक्ष वेधून घेण्याची हौस जिवावर बेतल्याने सैरभैर झालेल्या रिकवर एकामागून एक संकटे कोसळायला सुरुवात होते. त्याची पत्नी त्याला घटस्फोट देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करते. आजाराच्या संशोधनासाठी लोकांकडून जमा करण्यात येणारा निधी पळवला जातो. वृत्तमाध्यमांमध्ये ही वार्ता पसरल्याने लोकांच्या रोषाचा रिकला सामना करावा लागतो. पण या सर्वापेक्षा अधिक घातक असते निद्राहीन अवस्थेतील एकेक दिवस पुढे सरकताना त्याची घसरत जाणारी मनोवस्था.

चित्रपट टाइम स्क्वेअरमधील वर्दळीच्या रंगांसोबत झोप नसलेल्या अवस्थेतील बदलत जाणाऱ्या रिकला एकत्र करते. फ्रान्स्वा आर्नो या अभिनेत्याने त्या वेगवेगळ्या अवस्था पकडण्यात यश मिळविलेले आहे. चित्रपट बहुतांश वेळ बुथमधल्या चार भिंतीमध्ये घडतो. इतर अनेक व्यक्तिरेखा असल्या, तरी एकपात्री प्रयोगासारखा सुरू राहणारा हा निद्राविरोधाचा खेळ थरारासाठी वापरलेल्या नवकल्पनांसाठी पाहायला हरकत नाही