करोना या संसर्गजन्य आजाराचा मुकाबला करत असतानाच एका नैसर्गिक संकटानं महाराष्ट्राच्या दारावर थाप मारली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झाले. त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता असून, दुपारी ते दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान अलिबागजवळ धडकण्याची भीती व्यक्त करण्यात आहे. असं असतानाच दुसरीकडे सोशल नेटवर्किंगवर चर्चा आहे ती ट्विटस्टर या चित्रपटाची. पण हा चित्रपट अचानक चर्चेत येण्यामागील कारण काय आहे तर या चित्रपटाची कथा…

चक्रीवादळाचा पाठलाग करणाऱ्या स्ट्रोम चेसर्स एका वादळाचा पाठलाग कसा करता यासंदर्भातील हा चित्रपट आहे. १९९६ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट जॅन डे बोण्ट यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात हेलन हंट, बिल पॅक्स्टन, जामी गर्टझ आणि कॅरी एल्वेस यांच्या मुख्य भूमिका आहेत. ओक्लाहोमा राज्यामध्ये एकापाठोपाठ एक येणाऱ्या चक्रीवादळांवर अभ्यास करणाऱ्या स्ट्रोम चेर्सरची ही कथा आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला त्या साली हा सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी होता. या चित्रपटाची केवळ अमेरिकेमध्ये पाच कोटीहून अधिक तिकीटं विकली गेली होती. त्या काळात या चित्रपटाने जगभरामध्ये ४९ कोटी अमेरिक डॉलर्सपेक्षा अधिक कमाई केली होती. या चित्रपटाला अकॅडमी अवॉर्ड म्हणजेच ऑस्कर्समध्ये ‘सर्वोत्तम व्हिज्युअल इफेक्ट’ आणि ‘सर्वोत्तम साऊण्ड’साठी नामांकन मिळालं होतं. मात्र ‘द इंडिपेडंट डे’ला ‘सर्वोत्तम व्हिज्युअल इफेक्ट’ आणि ‘द अमेरिकन पेटंट’ला ‘सर्वोत्तम साऊण्ड’चा पुरस्कार मिळाला होता.

नक्की वाचा >चक्रीवादळं म्हणजे काय?, चक्रीवादळांचा इशारा कधी दिला जातो?, त्यांना नावं कशी दिली जातात?

काय आहे कथा?

१९६९ च्या कालावधीमध्ये ओकलाहोमामध्ये एकामागोमाग एक चक्रीवादळे येतात. त्यावेळी चित्रपटामधील नायिका आणि तिच्यासोबत संशोधन करणारे काही मित्र या वादळांमध्ये नक्की काय असतं यासंदर्भातील माहिती गोळा करण्यासाठी त्यामध्ये सेनसर्स असणारे काही चेंडूसारखे गोळे एका यंत्राच्या माध्यमातून टाकण्याचा प्रयत्न करत असतात. वादळाच्या मध्यभागी म्हणजेच डोळ्यामध्ये हे यंत्र जावे म्हणून वादळाची दिशा कशी असेल याचा अंदाज घेऊन वादळाच्या आधी ते जिथे धडकणार आहे त्या ठिकाणी जाऊन हे यंत्र वादळाच्या मार्गात ठेवण्याचे आवाहन या गटासमोर असते. असं करताना त्यांना अनेकदा अपयश येतं. पण खरोखरच त्यांना हे यंत्र वादळामध्ये ठेवता येतं का यासंदर्भातील रंजक कहाणी या चित्रपटामध्ये मांडण्यात आली आहे. चित्रपटामधील काही दृष्य खरोखरच उत्तम प्रकारे चित्रित करण्यात आली आहेत.

कुठे पाहता येईल

हा चित्रपट भारतीय चित्रपट चाहत्यांना अॅमेझॉन प्राइमवर पाहता येईल.