दूरचित्रवाहिन्यांमुळे हल्ली स्टॅंडअप् कॉमेडी शोज्ना बरे दिवस आले आहेत. झी मराठीवरील ‘जरा हवा येऊ द्या’ने तर या प्रकाराची लोकप्रियता शिगेला नेली आहे. लेखक-दिग्दर्शक-अभिनेते संतोष पवार हे तर ज्याची बाजारात सध्या जोरात हवा आहे अशा लाटेवर लीलया स्वार होणारे हरहुन्नरी कलाकार असल्याने त्यांनी याचा लाभ उठवला नसता तरच नवल. त्यामुळे सध्या चलती असलेल्या स्टॅंडअप् कॉमेडीची ‘संतोष पवारी’ आवृत्ती त्यांनी लगोलग रंगमंचावर आणली आहे.. तीही ‘जरा हवा येऊ द्या’ या नावानेच! खरं तर याआधीही त्यांनी असा एक रंगाविष्कार काही वर्षांमागे सादर केल्याचं अनेकांच्या स्मरणात असेल.
तीन पात्रं.. त्यात जातिवंत सोंगाडय़ाची अफाट गुणवत्ता असलेले संतोष पवार दस्तुरखुद्द काम करताहेत म्हटल्यावर विनोदाची भट्टी जमलीच म्हणून समजा. या या रंगाविष्काराला तोंडदेखलं एक सूत्रही आहे. गावातले तीन बेकार तरुण (पैकी एक तरुणी!) नोकरीच्या वाटेला न जाता आपलं नशीब वेगळ्या क्षेत्रात आजमावायचं ठरवतात. काहीही झालं तरी तिघांनी एकाच क्षेत्रात नशीब जोखायचं, हेही ठरलेलं. सुरुवातीला आपल्या आवडीच्या क्षेत्रात ते हात-पाय मारून पाहतात. पण त्यात अपयश पदरी पडल्याने मग ज्या क्षेत्रात कसलंही भांडवल न गुंतवता पैका करता येतो अशा क्षेत्रात ते जायचं ठरवतात. परंतु हेही आपलं काम नोहे, हे त्यांना लवकरच कळून चुकतं. सरतेशेवटी आपल्या अंगीच्या कलेआधारे आपलं करिअर घडवायचा निर्धार ते करतात. आणि मोठय़ा कष्टांनी अखेरीस ते त्यात यशस्वीही होतात.
नाना, बेबी आणि बापू अशी या तिघा मित्रांची नावं. त्यांचे आई-बाप गावभर उंडारणाऱ्या आणि आयतं गिळणाऱ्या या पोरांपायी हैराण झालेले. पण या तिघांना त्याचं काहीच नाही. मात्र यथावकाश त्यांनाही वाटू लागतं, की असे किती काळ आपण घरच्यांना खायला काळ होणार? आता पोटापाण्याचा काहीतरी धंदा बघायला हवा. पण काहीही झालं तरी नोकरी करायची नाही, हा त्यांचा इरादा मात्र पक्का असतो. पोटापाण्याच्या शोधात समाजसेवा ते अभिनेते.. व्हाया (नाइलाजानं!) नोकरी, राजकारण अशा नाना क्षेत्रांत ते आपली डाळ शिजते का, हे अनुभवून बघतात. त्यांचा हा सगळा कष्टमय, तितकाच विनोदी प्रवास म्हणजेच ‘जरा हवा येऊ द्या’ हा रंगाविष्कार!
संतोष पवार यांच्या उत्स्फूर्त कल्पनाशक्तीतून आणि त्यांच्या फेव्हरिट इम्प्रोव्हायझेशन्समधून ‘जरा हवा येऊ द्या’ आकारत जातं. त्यात आचरटपणा, शाब्दिक कोटय़ा, स्लॅपस्टिक कॉमेडी, पीजे, शारीर विनोद अशा सगळ्या ‘संतोष पवारी’ मसाल्यांचा त्यांनी मनसोक्त वापर केला आहे. त्याकरता लागणारे हुन्नरी कलावंत त्यांनी नेहमीप्रमाणे निवडले आहेत. या रंगाविष्कारात एकामागून एक भन्नाट वेगाने घटना-प्रसंग उलगडत जात असल्याने लोककलेतल्यासारखी लवचिक वेशभूषा, रंगभूषा आणि सादरीकरणाच्या क्लृप्त्या त्यांनी यात सफाईने योजल्या आहेत. प्रसंगानुसार बाप, आई, पीडित स्त्री, समाजसेवक, राजकारणी, गायक, वादक, नर्तक, नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नांतले बेकार तरुण, रिअॅलिटी शोमधील कलावंत, अभिनेते अशी नानाविध सोंगं तिघं वठवतात. क्षणभरही उसंत न घेता एकापाठोपाठ ही सोंगं समोर येत असल्यानं त्यातली रंगत उत्तरोत्तर वाढत जाते. स्टॅण्डअप् कॉमडी शो हा येनकेन प्रकारेण मनोरंजन करणारा कार्यक्रम असल्याने आणि या प्रकारात संतोष पवार यांचा हातखंडा असल्याने चार घटका डोकं बाजूस ठेवून करमणूक करवून घ्यायला आलेल्यांचा छान टाइमपास होतो.
‘जरा हवा येऊ द्या’चे सूत्रधार असलेल्या संतोष पवार (नाना) यांनी आई, बाप, शाहीर, राजकारणी, समाजसेवक, शास्त्रीय गायक, अभिनेता अशा वेगवेगळ्या भूमिकांत अक्षरश: धमाल आणली आहे. त्यांचा विनोदाचा सेन्स जबरदस्त आहेच; शिवाय त्यांच्यातलं सोंगाडेपणही त्यांनी यात कामी आणलं आहे. शास्त्रीय गायकाचं त्यांचं सोंग तर या सर्वावर कडी करणारंच. अभिनेत्याचा त्यांचा अवतार त्यांच्यातल्या सखोल अभिनेत्याचं दर्शन घडवतो. नैसर्गिक व्यक्तिमत्त्वाची देणगी नसतानाही मुकेश जाधव यांनी विविध भूमिकांतून बहार आणली आहे. त्यांचा ‘बाल्या’ अफलातूनच. संतोष पवारांची ही खासियत आहे, की ज्यांना रूढार्थाने मराठी रंगभूमी नट म्हणून स्वीकारणं अशक्य- अशांना घेऊन ते त्यांचे कलागुण प्रेक्षकांसमोर आणतात. पुढे ही नट मंडळी आपल्या अंगभूत कर्तृत्वानं त्यांचा हा विश्वास सार्थ करतात, ही गोष्ट अलाहिदा. रंगभूमीला हे ‘नट’पूर्ण वळण देणाऱ्या संतोष पवार यांचं हे योगदान मराठी रंगभूमीच्या इतिहासात खचितच नोंदलं जाईल. बेबी झालेल्या श्रुती कुलकर्णी यांनी त्यांना चांगली साथ दिली आहे. मात्र, या दोघांमधल्या लवचिकतेचा अभाव त्यांच्यात जाणवतो.
‘जरा हवा येऊ द्या’च्या यशस्वीतेत अमीर हडकर (संगीत), ओमकार दत्त (वेशभूषा), चेतन पडवळ (प्रकाशयोजना), सुनील कदम (ध्वनिसंयोजन), मुकेश गायकवाड (कपडेपट), स्वप्नील गोडबोले (गायन) यांचाही मोलाच वाटा आहे. चार घटका टाइमपाससाठी ‘हवा येऊ द्या’ला जायला कोणतीच हरकत नाही.