‘डान्स इंडिया डान्स’ या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली होती. देशाच्या अगदी दुर्गम भागातून बरीच कलाकार मंडळी या कार्यक्रमात येऊन आपली कला सादर करतात. पहिल्या पर्वापासून ते आता सहाव्या पर्वापर्यंत ‘डीआयडी’ म्हणजेच ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून शक्ती, धर्मेश, राघव जुयाल, पुनीत, सलमान असे कित्येक चेहरे उदयास आले. अनेकांची स्वप्नं मार्गी लावणाऱ्या या कार्यक्रमाच्या सहाव्या पर्वात सध्या असाच एक महत्त्वाकांक्षी स्पर्धक आला असून, त्याच्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

‘डिआयडी’च्या सहाव्या पर्वात आलेल्या लातूरच्या दीपक हुलसरेने सोशल मीडियावरही अनेकांचे लक्ष वेधले आहे. दीपक मुळचा लातूरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या जगळपूर गावचा आहे. ‘नृत्य म्हणजे माझा जीव आहे’, असेच तो सर्वांना सांगतो. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय फक्त आपल्या आवडीखातर तो ही कला शिकला. सराव करण्यासाठी मोठमोठ्या खोल्या नसल्यामुळे त्याने केशकर्तनालयातील आरसा घेऊन मोकळ्या रानात नृत्याचा सराव केला. आपल्याकडे नसणाऱ्या गोष्टींची काळजी न करता ज्या गोष्टी आपल्यापाशी आहेत त्यांच्या मदतीने दिपकने त्याची कला आणखीन खुलवली.

वाचा : कमल हसनच्या ‘अप्पूराजा’तील ‘अप्पू’ साकारण्यासाठी करण्यात आल्या होत्या या करामती

बालपणापासूनच नृत्याची आवड असणाऱ्या दीपकने महाविद्यालयीन दिवसांमध्ये मित्राच्या घरी टीव्हीवर एक परफॉर्मन्स पाहिला आणि तेव्हापासून त्याच्या मनात नृत्यकलेविषयी एक खास जागा तयार झाली. जिद्द, चिकाटी आणि प्रचंड आत्मविश्वास या गोष्टींच्या बळावर दिपकने हमारी अधुरी कहानी’ या गाण्यावर ‘डीआयडी’च्या मंचावर आपली कला सादर केली. त्याचा परफॉर्मन्स सुरु असताना प्रत्येक ‘फ्लिप’ आणि नृत्यातून व्यक्त होणाऱ्या त्याच्या भावना पाहून परीक्षकही अवाक् होते. परफॉर्मन्स संपल्यानंतर परीक्षकांशी संवाद साधताना दीपकने त्याचा आतापर्यंतचा प्रवास सर्वांसमोर आणाला. आपण फक्त आणि फक्त इंटरनेटवरील व्हिडिओ पाहूनच ही कला शिकलो, असे त्याने स्पष्ट केले.