पाश्चात्य देशांमध्ये सध्या वर्णद्वेषाविरोधात आंदोलन सुरु आहे. ‘ब्लॅक लिव्ह्स मॅटर’ असं म्हणत सुरु झालेल्या या आंदोलनाचे पडसाद आता IPLमध्येही उमटू लागले आहेत. अलिकडेच सनराईजर्स हैद्राबाद संघात खेळणाऱ्या डॅरेन सॅमी या वेस्टइंडिज खेळाडूनं त्याला ‘काळू’ म्हणून चिडवायचे असा खुलासा केला होता. या प्रकरणामध्ये अभिनेत्री स्वरा भास्करने देखील उडी घेतली. “डॅरेन सॅमीसाठी ‘काळू’ हा शब्दप्रयोग करणाऱ्या खेळाडूंनी अधिकृतरित्या माफी मागायला हवी.” असं ट्विट तिने केलं होतं. या ट्विटवर आता स्वत: सॅमीने तिला उत्तर दिलं आहे.

काय म्हणाला सॅमी?

“काळू हा शब्दप्रयोग ते प्रेमापोटी करत होते. माझा अपमान करावा हा त्यांचा उद्देश नव्हता. माझे सर्व गैरसमज आता दूर झाले आहेत. कृष्णवर्णीय असल्याचा मला अभिमान आहे.” अशा आशयाचे ट्विट करुन डॅरेन सॅमीने स्वरा भास्करच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे.

यापूर्वीही सॅमीने एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्याने ‘काळू’ या शब्दाबाबत आपला गैरसमज झाल्याचं मान्य केलं होतं. “वर्णद्वेषाच्या प्रकरणासंदर्भात मी एका माजी सहकाऱ्याशी सकारात्मक चर्चा केली. त्याच्या उत्तराने मी समाधानी आहे. आम्ही नकारात्मकता पसरवण्यापेक्षा लोकांना याबाबत शिक्षित केलं पाहिजे यावरही चर्चा केली. ते लोक मला प्रेमाने ‘काळू’ म्हणत असल्याचे त्याने मला सांगितलं आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे” असं ट्विट सॅमीनं केलं होतं.