बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणने आजवर विभिन्न भूमिका साकारत आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखवली. दीपिकाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ती लवकरच एका बिग बजेट चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट ‘महाभारत’ या पौराणिक कथेवर आधारित आहे. भारतीय जनमानसात रुजलेले एक महामिथक म्हणून या कथाकाव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेकडो लहान-मोठय़ा व्यक्तिरेखा आणि नानाविध घटनांचा महागोफ उलगडत जाणारे महाभारत आता द्रौपदीच्या नजरेतून पाहायला मिळणार आहे. यात द्रौपदीची भूमिका दीपिका साकारणार आहे.

याविषयी दीपिका म्हणाली, ”द्रौपदीची भूमिका साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. महाभारतातून बरंच काही शिकायला मिळतं. आता एका नव्या दृष्टीकोनातून महाभारताला समजून घेणं खूप औत्सुक्याचं आणि महत्त्वपूर्ण असेल.”

या चित्रपटाला दोन भागांत प्रेक्षकांच्या भेटीला आणलं जाईल आणि याचा पहिला भाग २०२१ साली दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. मधू मंटेनासह दीपिका या चित्रपटाची सहनिर्माती आहे. चित्रपट निर्माते मंटेना म्हणतात की, ”महाभारतासारखं काव्य द्रौपदीच्या नजरेतून मोठ्या पडद्यावरून पुन्हा सांगणे मोठी जबाबदारी आहे. जवळपास प्रत्येकाला महाभारताची ओळख आहे. पण आमच्या चित्रपटातून एक वेगळा दृष्टीकोन प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न असेल.”