‘बाजीराव मस्तानी’, ‘पिकू’ आणि ‘पद्मावत’च्या यशानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोन ही बॉलिवूडमधली सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. आतापर्यंत अभिनेत्याच्या तुलनेत अभिनेत्रींना मिळणारं मानधन हे खूपच कमी होतं. मात्र ‘पिकू’ आणि ‘पद्मावत’मध्ये सहकलाकारांच्या तुलनेत तिला सर्वाधिक मानधन मिळालं. हे मानधन रणवीर सिंग, शाहिद कपूर, अमिताभ बच्चन, इमरान खान यांना मिळणाऱ्या मानधनापेक्षाही अधिक होतं. मानधनाच्या बाबत आपण कोणत्याच तडजोडी यापुढे करणार नाही असं ती म्हणाली.

‘कोणत्या चित्रपटासाठी किती मानधन घ्यायचं हे मला ठावूक आहे. माझा अभिनय, माझं काम या सर्वांची कल्पना मला आहे. त्यामुळे मी माझ्या कामाला अनुसरूनच मानधन मागते. मानधनाच्या बाबतीत कोणतीच तडजोड मी यापुढे करणार नाही. कोणाला किती मानधन दिलं जातं याची कल्पना प्रत्येकाला असते मलाही आहे. एका चित्रपटाच्या निर्मितीसाठी किती खर्च येतो हेही मला ठावूक आहे त्यामुळे या सगळ्याचा विचार करूनच मी मानधन मागते. मात्र जर अभिनेत्याला जास्त मानधन द्यायचं आहे म्हणून तुम्हाला कमी मानधन देतोय असं जर मला कोणी सांगितलं तर मात्र मी हे खपवून घेणार नाही, तर मी मानधनाच्या बाबतीत कधीच तडजोड करणार नाही असं मत दीपिकानं एका मुलाखतीत मांडलं आहे.

दीपिकाचा ‘छपाक’ चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मेघना गुलजार या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून दीपिका प्रथमच सहदिग्दर्शिकेच्या भूमिकेत या चित्रपटात दिसणार आहे.