लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये सोमवारी देशभरातील नऊ राज्यांतील ७१ जागांसाठीचं मतदान पार पडलं. यावेळी राज्यातील नागरिकांसोबतच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. तर काही कलाकारांची मात्र मतदान करण्याची संधी हुकली. यामध्ये अक्षय कुमार, आलिया भट्ट,दीपिका पदुकोण या कलाकारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दीपिका पदुकोणचा जन्म डेन्मार्कचा असून तिच्याकडे दानिश पासपोर्ट आहे. त्यामुळे तिने लोकसभा निवडणूक २०१९ साठी मतदान केलं नाही अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली होती. मात्र दीपिकाने मतदानानंतरचा एक फोटो पोस्ट करत या अफवांना पूर्णविराम दिला आहे.

“मी कोण आहे, कोणत्या देशातून, शहरातून किंवा कोणत्या भागातून आले आहे. याबाबत मला जराही साशंकता नाही. परंतु जर कोणी माझ्या नागरिकत्वावर शंका घेत असेल तर त्यांनी त्यांचा गैरसमज दूर करावा”, असं कॅप्शन देत दीपिकाने मतदान केल्यानंतरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. विशेष म्हणजे या फोटोमुळे तिने तिच्या नागरिकत्वावर निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हांना पूर्णविराम दिला आहे.

दरम्यान, २०१४ साली झालेल्या आयफा (IIFA) पुरस्कार सोहळ्यात दीपिकाने तिच्या पासपोर्टबाबत असलेल्या अफवांवर खुलासा केला होता. तिच्याकडे भारताचा पासपोर्ट असल्याचा खुलासा तिने यावेळी केला होता.