दीपिका पदुकोणच्या या वर्षी आलेल्या ‘ रेस-२’ आणि ‘ये जवानी है दीवानी’ चित्रपटांनी १०० कोटी रूपयांची उलाढाल केली असली, तरी १०० कोटींच्या क्लबला महत्व देत नसल्याचे दीपिकाचे म्हणणे आहे.
‘रेस-२’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या सफलतेमुळे दीपिका आनंदित असून, अलीकडेच आलेल्या ‘ये जवानी है दीवानी’ या तिच्या चित्रपटाला देखील बॉक्स ऑफिसवर भरपूर यश मिळाले. ‘ये जवानी है दीवानी’ चित्रपट प्रदर्शनाच्या सुरूवातीच्या आठवड्यातच १०० कोटींचा आकडा पार करणारा पहिला चित्रपट ठरला.
दीपिका म्हणाली, जेव्हा तुमचे चित्रपट चालतात आणि त्यांचे कौतुक होते, तेव्हा खूप चांगले वाटते. हे एखाद्या बोनससारखे असते. परंतु, मी १०० कोटी क्लबला महत्व देत नाही. माझ्या कामावर पूर्ण लक्ष देत मी चांगले काम करू इच्छिते. एखादा चित्रपट चांगला नसला आणि त्याने चांगला धंदा केला तर काय होईल… माझ्या मते सगळे चांगले चित्रपट चालले पाहिजेत.
हल्ली मसाला प्रकारातील चित्रपट १०० कोटींपेक्षा जास्त धंदा करत आहेत. परंतु, दीपिकाला वाटते की, चित्रपटांच्या सफलतेचे श्रेय कोणत्या एका चित्रपट प्रकाराला देणे योग्य होणार नाही.
ती म्हणाली, जेव्हा ‘ये जवानी है दीवानी’ आणि ‘बर्फी’सारखे चित्रपट चालतात किंवा अन्य चित्रपट चांगला धंदा करतात. तेव्हा खूप चांगले वाटते. चित्रपटाच्या सफलतेला कोणत्या एका प्रकारात बांधले जाऊ शकत नाही, जसे हा अॅक्शन किंवा मसाला चित्रपट आहे म्हणून ते चांगला धंदा करत आहेत. सर्व चांगले चित्रपट चांगला धंदा करतील.