बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित ‘छपाक’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका लक्ष्मीची भूमिका साकारणार आहे. पण ही भूमिका साकारणे दीपिकाला मानसिक दृष्ट्या कठीण झाले होते.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये दीपकाने ‘छपाक’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना ती नैराश्यामध्ये गेल्याचे उघडपणे सांगितले. ‘ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी माझ्यासोबत मानोसोपचार तज्ञ असणे माझ्यासाठी गरजेचे होते. मला असे वाटू लागले हे माझ्यासोबत घडले आहे. पण नंतर त्याचा माझ्या मनावर आणखी परिणाम झाला आणि मला या विकृत घटनेबद्दल भीती वाटू लागली. मानसिकदृष्ट्या माझ्यासाठी हे खूप कठीण होते. त्या दिवसांविषयी विचार करणे आणि मानसिकदृष्ट्या त्या भूमिकेत स्वत:ला झोकावून घेणे फारच कठीण होते’ असे दीपिका म्हणाली.

काही दिवसांपूर्वी दीपिकाच्या ‘छपाक’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. चित्रपटात दीपिका ही लक्ष्मीची भूमिका साकारत असून त्यासाठी तिने प्रोस्थेटिक मेकअपचा वापर केला आहे. १० जानेवारी २०२० मध्ये ‘छपाक’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मेघना गुलजार यांच्या या चित्रपटात दीपिकासोबत काम करण्याची मोठी संधी अभिनेता विक्रांत मेस्सीला दिली आहे. आतापर्यंत अनेक चित्रपटात सहकलाकाराची भूमिका साकारणारा विक्रांत ‘छपाक’ चित्रपटातून प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात अॅसिड हल्ला झालेल्या लक्ष्मीचा जीवन जगण्याचा सकारात्मक दृष्टीकोन दाखवण्यात येणार आहे. अॅसिड हल्यानंतर करावा लागणारा संघर्ष आणि तिच्यावर ओढावणाऱ्या संकटांवर मात करुन ती अखेर सुखी आयुष्य जगते हे दाखवण्यात आले आहे.