ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने #MeToo या मोहिमेअंतर्गंत केलेल्या आरोपानंतर कलाविश्वामध्ये हे प्रकरण चांगलंच गाजलं. या मोहिमेच्या माध्यमातून अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. यामध्ये कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांचीही नावं समोर आली. प्रचंड चर्चेत आलेलं हे प्रकरण काही काळानंतर थांबलं. मात्र अभिनेत्री दीपिका पदुकोणने यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

#MeToo अंतर्गत ज्या कलाकारांवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत, अशा व्यक्तींसोबत चित्रपटात काम न करण्याचा निर्णय दीपिकाने घेतला आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी दीपिकाने चित्रपट दिग्दर्शक लव रंजन यांचा आगामी चित्रपटासाठी होकार कळविला होता. त्यानंतर सोशल मीडियावर #NotMyDeepika हा हॅशटॅग चांगलाच व्हायरल झाला होता. लव रंजन यांच्यावरदेखील #MeToo मोहिमेअंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते, त्यामुळे हा हॅशटॅग व्हायरल झाला होता.

दीपिकाने नुकतंच वोग मासिकासाठी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत बोलताना दीपिकाने हा महत्वाचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. तूला चित्रपटामध्ये कोणत्या व्यक्तींसोबत काम करायला आवडणार नाही, असा प्रश्न दीपिकाला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना दीपिकाने हा निर्णय सांगितला. ज्या व्यक्तीवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत, अशा व्यक्तीसोबत मी कधीही काम करणार नाही, असं दीपिका म्हणाली.

दरम्यान, दीपिकाने घेतलेल्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. अनेक चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून हा आनंद व्यक्त केला आहे. दीपिका सध्या तिच्या आगामी ‘छपाक’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट अॅसिड हल्ल्यातून बचावलेली लक्ष्मी अगरवाल हिच्या जीवनावर आधारित असून चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहेत.