बॉलिवूडमधल्या दोन आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये वैर असणं ही गोष्ट इण्डस्ट्रीच काय पण चाहत्यांनाही काही नवी नाही. तर बॉलिवूडमध्ये दीपिका आणि कतरिना यांच्यामधला विस्तव काही केल्या जात नाही. या दोघींमधल्या वैराचं प्रमुख कारण म्हणजे अभिनेता रणबीर कपूर होय. दीपिकानंतर रणबीरचं कतरिनाशी सूत जुळलं, मात्र दीपिकामुळेच या दोघांमध्ये अनेकदा भांडणंही झालं. त्यामुळे या दोन्ही अभिनेत्रीमधलं भांडणं तसं खूप जुनं. मात्र आता हे भांडण विसरून मोठ्या मनानं दीपिकानं मैत्रिचा हात पुढे केला आहे.

नुकताच कतरिनाचा वाढदिवस साजरा झाला. यावेळी वैर विसरून दीपिकानं कतरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच तिला उदंड आयुष्य लाभो असंही दीपिका शुभेच्छा देत म्हणाली. दीपिकाच्या या शुभेच्छांची चर्चा आता सगळीकडेच सुरू आहे. दीपिकानं दाखवलेला मनाचा मोठेपणा सगळ्यांनाच भावला. कतरिना आणि दीपिका या दोघीही एका प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधन कंपनीच्या सदिच्छादूत आहेत.

कतरिनानं नुकताच आपल्या कुटुंबियांसोबत इंग्लडमध्ये वाढदिवस साजरा केला. कतरिनाच्या वाढदिवसानिमित्तच आलियानंदेखील तिला हटके शुभेच्छा दिल्या होता. रणबीरमुळेच आलिया आणि कतरिनाच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात होतं. मात्र कतरिनाचा फोटो शेअर करून आपल्या मैत्रीत सारं काही आलबेल असल्याचं तिनं दाखवून दिलं.