लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असतो. कारण, या दिवशी एका नव्या व्यक्तीशी नातं जोडलं जातं आणि त्याच्यासोबत संपूर्ण आयुष्याचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला जातो. हा दिवस संस्मरणीय व्हावा यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणनेही लग्नासाठी बरीच तयारी केली आहे. सोशल मीडियावर या लग्नाची घोषणा झाल्यापासूनच त्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.

१४ आणि १५ नोव्हेंबर रोजी इटलीतील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी दीपिका- रणवीरचा लग्नसोहळा पार पडणार आहे. मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडणार असून त्यासाठी जंगी तयारी करण्यात आली आहे. लग्नसोहळ्यात मोबाइल वापरावरही बंदी आहे. छोट्यातल्या छोट्या गोष्टीवरही कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

वाचा : छोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम

विशेष म्हणजे, रणवीर- दीपिकाने लग्नातील जेवणासाठी शेफसोबत खास करार केला आहे. या करारानुसार लग्नात बनवण्यात येणारे पदार्थ पुन्हा कुठेच बनवण्यात येणार नाही. बॉलिवूडमधील या खास लग्नाची उत्सुकता सर्वांनाच आहे.

इटलीत विवाहसोहळा पार पडल्यानंतर दीपिका वीर लगेचच मुंबईत परतणार आहे. जे लग्नासाठी इटलीत उपस्थिती राहणार नाही त्यांच्यासाठी मुंबईत जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. २८ नोव्हेंबरला मुंबईतील ग्रँट हयात या आलिशान ठिकाणी दीप-वीरची रिसेप्शन पार्टी असणार आहे. या पार्टीसाठी संपूर्ण बॉलिवूडला आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे या रिसेप्शन पार्टीत बॉलिवूडमधल्या बड्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार हे नक्की.