बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या अभिनेत्री दीपिका पादुकोणचा आज वाढदिवस. ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून दीपिका पदुकोणनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. शाहरुखसोबत तिनं या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली होती. शाहरुखच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या दीपिकाची त्यावेळी जोरदार चर्चा होती. पण, नंतर मात्र एकापाठोपाठ एक फ्लॉप चित्रपटामुळे दीपिका काहीशी मागे पडली. २००९ मध्ये आलेल्या ‘लव्ह आज कल’ चित्रपटाच्या माध्यमातून तिच्या नावाला खरी ओळख मिळायला सुरूवात झाली. या चित्रपटानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलंच नाही. आज जगातील सर्वात सुंदर महिला, सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री अशा अनेक यादीत दीपिका वरचढ आहे.

दीपिकानं ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असलं तरी चित्रपटसृष्टीतील तिच्या करिअरची सुरुवात मात्र कन्नड चित्रपटानं झाली होती. २००६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘ऐश्वर्या’ हा तिचा पहिला कन्नड चित्रपट होता. २००६ मध्ये सर्वाधिक प्रसिद्ध आणि कमाई केलेल्या कन्नड चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश होता. दिग्दर्शक फराह खानने दीपिकाला हिमेश रेशमीयाच्या एका म्युझिक व्हिडिओमध्ये पाहिले होते आणि त्यानंतर ‘ओम शांती ओम’साठी तिची निवड करण्यात आली होती. दीपिकाला या चित्रपटासाठी पदार्पणाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता.