‘सेक्रेड गेम्स २’ या वेब सीरिजमुळे सोशल मीडियावरील ‘कॉन्ट्रोव्हर्सी किंग’ अशी ओळख असलेला बॉलिवूडमधील दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा एका नव्या वादात अडकला आहे. या वेब सीरिजमधील एका दृष्यामुळे शीख समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत अशी तक्रार भाजपाने केली आहे. दिल्ली भाजपाचे प्रवक्ते तेजेंद्र पाल सिंग बग्गा यांनी अनुराग कश्यप यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. ‘सेक्रेड गेम्स’ या सीरिजमध्ये अभिनेता सैफ अली खानने एका शीख पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या सीरिजच्या दुसऱ्या सिझनमधील एका दृश्यामध्ये सैफने त्याच्या हातातील कडा काढून समुद्रात फेकला आहे. बग्गा यांनी या दृश्यावर अक्षेप घेतला आहे. बग्गा यांनी एफआयआरमध्ये ‘कडा हा शिख धर्मामध्ये अतिशय पवित्र मानला जातो. हा कडा विश्वासाने आणि आदराने परिधान केला जातो’ असे लिहिले आहे.

सीरिजचा दिग्दर्शक अनुराग कश्यपने शीख धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप बग्गा यांनी केला आहे. दरम्यान हे दृश्य दिग्दर्शकाने शीख समाजाला भडकावण्यासाठी मुद्दाम सीरिजमध्ये टाकल्याचा आरोपही बग्गा यांनी अनुरागवर केला आहे. यापूर्वीही अकाली दल पक्षाचे खासदार मनजिंद सिंह सिरसा यांनी ‘सेक्रेज गेम्स’ ही वेब सीरिज बंद करण्यास नेटफ्लिक्सला सांगितले होते.

गेल्या काही दिवसांपासून अनुराग कश्यप वेगवेगळ्या वादांमध्ये अडकला आहे. त्याने १० ऑगस्ट रोजी त्याचे अधिकृत ट्विटर अकाऊंट डिअ‍ॅक्टीवेट केले. अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहिलेल्या अनुरागच्या आई-वडीलांना आणि मुलीला सतत धमकीचे फोन,मेसेज येत असल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला. अकाऊंट डिअॅक्टीवेट करण्यापूर्वी अनुरागने दोन पोस्ट शेअर केल्या होत्या. या पोस्टमध्ये त्याने ट्विटर अकाऊंट डिअ‍ॅक्टीवेट करण्यामागचे कारण सांगितले होते.