वेब सिरिज आणि यु ट्यूब चॅनल्सच्या दिवसांमध्ये आणखी एक गाजलेलं नाव म्हणजे हॉट स्टार. स्मार्टफोन असणाऱ्यांकडे हे अॅप सहसा आढळते. पण सध्या स्टार इंडिया प्राइवेट लिमिटेड अंतर्गत चालवले जाणारे संकेतस्थळ ‘हॉट स्टार’ चांगलेच अडचणीत आले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे हॉट स्टारवर लावण्यात आलेल्या आरोपांची पडताळणी करण्याची मागणी केली आहे.
बहुचर्चित हॉट स्टार या संकेतस्थळावर काही आक्षेपार्ह विषय आणि ‘सॉफ्ट पॉर्नोग्राफी’ उपलब्ध करुन दिल्याबद्दल हे संकेतस्थळ सध्या संकटात सापडले आहे. न्यायाधीश संजीव सचदेवा यांनी स्टार इंडिया आणि तिची सहायक कंपनी नोवी डिजिटल प्राइवेट लिमिटेड या दोन्ही कंपन्यांना नोटिस पाठवत सदर याचिकेविषयीचे स्पष्टीकरण मागितले आहे.
याचिकेमध्ये करण्यात आलेल्या आरोपांनुसार या संकेतस्थळाद्वारे कोणत्याही प्रकारच्या नियमांचे पालन न करता आक्षेपार्ह विषय प्रसारित करण्यात आले होते. हॉटस्टारवर सध्या क्रिकेट, टिव्ही कार्यक्रम, व्हिडिओ, चित्रपट आणि विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या कार्यक्रमांचेही प्रक्षेपण केले जाते.
हॉट स्टारशी निगडीत स्टार इंडिया आणि नोवा डिजिटल प्राइवेट लिमिटेड या दोन्ही कंपन्यांव्यतिरिक्त न्यायालयाने सुचना आणि प्रसारण मंत्रालयाकडूनही याबाबतचे स्पष्टीकरण मागितले आहे. हॉट स्टार वरील काही आक्षेपार्ह विषयांची पडताळणी का केली गेली नाही?या प्रकरणी ही विचारणा करण्यात येत आहे.
अन-कॅण्ड मीडिया प्रा. लि. ने दाखल केलेल्या याचिकेमुळे याप्रकरणीचा तपास होत आहे. या याचिकेनुसार मंत्रालयातर्फे हे संतेकस्थळ चालवणाऱ्या कंपनीची पजताळणी केली जात नाही. या संकेतस्थळावर असलेल्या व्हिडिओ अनसेन्सर्ड आहे आणि त्यावर कोणही आळा घालत नाहीये असाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे एका वेगळ्याच वळणावर येऊन थांबलेल्या या प्रकरणी पुढे काय कारवाई होणार याकडेच अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 18, 2016 4:11 pm