बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करुन जवळपास दीड महिना उलटला आहे. पण त्याच्या आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अनेक कलाकारांनी याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावर भाष्य केले आहे..

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये ‘सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, अशी लोकभावना आहे. पण, राज्य सरकारची तशी इच्छा दिसत नाही. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराची एक बाजू बाहेर आली आहे, त्यामुळे ईडी गुन्हा दाखल करू शकते’ असे म्हटले आहे.

बुधवारी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला वेगळ वळण मिळालं. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी सुशांतची गर्लफ्रेंड व अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये त्यांनी रियाने घर सोडताना घरातील रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड आणि सुशांतच्या वैद्यकीय सूचनांची कागदपत्रे सोबत नेली असे म्हटले आहे. तसेच सुशांतच्या खात्यामधील १५ कोटी रुपये देखील रियाने काढले असल्याचे म्हटले होते.