देशात २१ दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सुविधा सोडल्या तर सारं काही बंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनहितासाठी हा निर्णय घेतला आहे. मात्र ज्याप्रमाणे या निर्णयाचे फायदे आहेत. तसाच काहीसा तोटाही नागरिकांना सहन करावा लागत आहे. याचच अनुभव चेन्नईतील एका गरोदर महिलेला आला. काही दिवसापूर्वी रुग्णालयात दाखल केलेल्या गर्भवती महिलेला रक्ताची गरज होती. मात्र लॉकडाउन असल्यामुळे तिला मदत मिळणं अवघड झालं होतं. परंतु अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीच्या एका चाहत्यामुळे या महिलेला वेळेवर रक्त मिळालं असून बाळ आणि बाळंतीण सुखरुप आहे. या महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून देवोलीनाचे आभार मानले आहेत.

काही दिवसांपूर्वी चेन्नईमधील एका गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या महिलेची प्रसुतीवेळ जवळ आली होती. याचदरम्यान तिला ओ निगेटिव्ह रक्तगटाची आवश्यकता होती. विशेष म्हणजे ओ निगेटिव्ह हा रक्तगट फार कमी जणांमध्ये असतो. त्यामुळे कमी कालावधीत या महिलेला हा रक्तगट मिळणं कठीण होतं. त्यामुळे या महिलेच्या भावजयीने रम्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांची मदत मागितली होती. यात तिने फेसबुकवरील ‘वीरा’ या पेजवरही पोस्ट शेअर केली होती. याच पेजच्या माध्यमातून या महिलेला मदत मिळाली आहे. हे पेज देवोलीनाचा एक चाहता चालवत असून तो अडचणीत सापडलेल्यांसाठी मदत करत असतो.

फेसबुकवर असलेलं ‘वीरा’ हे पेज अभिनेत्री देवोलीनाचा एक फॅन चालवत असून या पेजच्या माध्यमातून तो अडचणीत सापडलेल्या अनेकांना मदत करत असतो. रम्याची पोस्ट वाचल्यानंतर या ग्रुपमधील एक व्यक्ती तब्बल १० किलोमीटर दूर चालत ही महिला असलेल्या रुग्णालयात पोहोचला आणि त्याने गर्भवती महिलेला रक्त दिलं. या व्यक्तीने केलेल्या रक्तदानामुळे गर्भवती महिलेचे आणि बाळाचे प्राण वाचले आहे. या घटनेनंतर रम्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून देवोलीनाचे आभार मानले आहेत.

दरम्यान, या महिलेने एका मुलीला जन्म दिला असून या बाळाचं नाव देवोस्मिथा अय्यर असं ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर देवोलीनाने ‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीत आनंद व्यक्त केला आहे. तसंच वीरा हे पेज माझा चाहता चालवत असून तो माझा मित्रही आहे, असं तिने सांगितलं.