आरे कॉलनीतील मेट्रोच्या कारशेडप्रकरणी न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री झाडे तोडण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारी रात्रीत जवळपास चारशेहून अधिक झाडं कापल्याची माहिती स्थानिकांनी दिली. झाडे तोडण्याचं हे काम पोलीस सुरक्षेत सुरू होतं. वृक्षतोडीची माहिती समजताच विविध ठिकाणाहून अनेक पर्यावरणप्रेमी कारशेडच्या बाहेर विरोधासाठी जमले. कारशेडच्या जागी कोणालाही प्रवेश नसल्यामुळे अनेकांनी बाहेर रस्त्यावरच ठिय्या दिला. यामध्ये बॉलिवूड कलाकारही मागे नाहीत. अभिनेत्री दिया मिर्झा, विशाल दादलानी, स्वरा भास्कर, अशोक पंडित अशा अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त केला आहे.

विशाल दादलानीने सोशल मीडियावार व्हिडीओ पोस्ट करत पंतप्रधान नेरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे. ‘रात्रीच्या वेळात आरेमधील झाडे तोडली जात आहेत. पंतप्रधान नेरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृपा करुन असे करु नका. एक फोन करा आणि हे सगळं थांबवा’ असे विशालने म्हटले आहे.

दिया मिर्झाने ‘आरेमध्ये झाडे तोडण्याचे सुरु असलेले काम बेकायदेशीर नाही?’ असे ट्विटद्वारे म्हटले आहे.

‘आरेमधील ३००० झाडे तोडल्यामुळे आम्ही शोक व्यक्त करत आहेत. ज्यांनी झाडांना आपल्या जीवनाचा एक भाग मानला आणि झाडे ही परमेश्वराची सर्वात मोठी देणगी मानली त्यांच्यासाठी हा सर्वांत वाईट दिवस आहे. या विनाशाची किंमत मुंबईला मोजावी लागणार आहे’ असे चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी ट्विट केले आहे.

आरे कारशेडच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू असताना ही घटना घडल्यामुळे पर्यावरण प्रेमींना धक्काच बसला. दरम्यान, वृक्ष प्राधिकरणाचा निर्णय महापालिकेच्या वेबसाईटवर शुक्रवारी संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर किती दिवसांचा प्रतिक्षा कालावधी आहे , यावर बराच गदारोळ रात्री उशिरापर्यंत सुरू होता.