अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडच्या घराणेशाहीवरून नवा वाद सुरू झाला आहे. घराणेशाहीवरून कलाकारांवर टीका होत असतानाच सध्या ट्विटरवर अभिनेता अर्जुन कपूर जोरदार ट्रेण्ड होऊ लागला आहे. यामागचं कारण म्हणजे लेखक चेतन भगत यांचं जुनं ट्विट. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकावर ‘हाफ गर्लफ्रेंड’ हा चित्रपट आला होत. मात्र या चित्रपटासाठी आधी सुशांत सिंह राजपूतची निवड झाल्याचं समजतंय. यासंदर्भातील चेतन भगत यांचा जुना ट्विट पुन्हा ट्रेण्ड होत असून नेटकरी अर्जुन कपूर व घराणेशाहीवर टीका करत आहेत.

मोहित सुरी दिग्दर्शित ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी सुशांत सिंह राजपूतची निवड झाली, असं ट्विट चेतन भगतने केलं होतं. मात्र ऐनवेळी काय झालं आणि सुशांतची जागा अर्जुन कपूरने का घेतली यामागचं कारण अद्याप अस्पष्टच आहे. सुशांतने मोहित सुरीची भेट घेतली होती आणि माधव झा या भूमिकेसाठी त्याने सर्व तयारीसुद्धा केली होती. “सुशांतने मेहनतीने आणि कामाने मी फार प्रभावित झालो. माझ्या चित्रपटासाठी मुख्य अभिनेता मिळाला”, अशा शब्दांत मोहित सुरीने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत आनंद व्यक्त केला होता.

सुशांतची जागा अर्जुन कपूरने का घेतली असा सवाल आता नेटकरी करत आहेत. इतकंच नव्हे तर ‘फितूर’ या चित्रपटासाठीही आधी सुशांतची निवड झाली होती, अशा आशयाचे ट्विटही व्हायरल होऊ लागले आहेत. नंतर ‘फितूर’मध्ये आदित्य रॉय कपूरने मुख्य भूमिका साकारली. बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून नेटकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.