संजय दत्त, अर्शद वारसी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘लगे रहो मुन्नाभाई’ हा चित्रपट २००६ साली प्रदर्शित झाला. कुप्रसिद्ध असलेला गुंड गांधी विचाराच्या प्रेमात पडतो, गांधीजींची शिकवण आचरणात आणतो साधरण अशा कथानकावर हा चित्रपट बेतला आहे. हिंसा हा धर्म मानणारा मुन्नाभाई गांधीजींच्या अहिंसेच्या प्रेमात पडतो आणि तसाच वागतो अशा कथेवर आधारलेल्या या चित्रपटानं प्रेक्षकांचं मन जिकंलं. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर प्रमुख भूमिकेत होते. विशेष म्हणजे ही भूमिका आपल्या निरागस हास्यामुळेच आपल्या वाट्याला आली असं दिलीप प्रभावळकर म्हणतात.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावात बोलताना त्यांनी ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटातील गांधीजींच्या भूमिकेबद्दल अनेक आठवणी जागवल्या. माझ्या निरागस हास्यामुळे ‘मुन्नाभाई लगे रहो’ चित्रपटात गांधीजींची भूमिका मिळाली. ल्युई फिशर यांच्या गांधींवरील पुस्ताकामुळे ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटात गांधी साकारताना मदत झाली. या पुस्तकामुळे एक व्यक्ती म्हणून महात्मा गांधी माझ्या समोर आले त्यामुळे या भूमिकेला मी योग्य न्याय देऊ शकलो. खरं तर ही भूमिका साकारताना महात्मा गांधी यांची व्यक्तिरेखा आणि त्या व्यक्तीरेखेतला मी प्रेक्षकांना आवडेल का असा प्रश्न सारखा मनात येत होता, मात्र प्रेक्षकांनी हे दोन्ही स्वीकारलं याचा आनंद आहे असं म्हणत प्रभावळकरांनी आठवणी जागवल्या.