एकीकडे नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन तीव्र होऊ लागलंय तर दुसरीकडे अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता दिलजित दोसांज यांच्यात ट्विटरवर शेतकरी आंदोलनावरून शीतयुद्ध रंगलंय. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने कंगनाने दिलजित व प्रियांका चोप्रावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिने ट्विट करत दिलजितला डिवचलं.

‘आज हैदराबादमध्ये बारा तास काम केल्यानंतर संध्याकाळी मी चेन्नईला एका कार्यक्रमासाठी जाणार आहे. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मी कशी दिसतेय?’, असं ट्विट करत ‘दिलजित कित्थे आ’ (दिलजित कुठे आहे) हा हॅशटॅग तिने जोडला. ट्विटरवर प्रत्येकजण त्याला शोधत आहे, असं ती पुढे म्हणाली. कंगनाच्या या ट्विटला दिलजितनेही त्याच्या अंदाजात उत्तर दिलं.

कंगनाचा उल्लेख न करता दिलजितने त्याचं दिवसभराचं वेळापत्रकच ट्विटरवर सांगितलं. ‘सकाळी उठल्यानंतर मी जिममध्ये व्यायाम केला. त्यानंतर दिवसभर काम आणि मग रात्री झोपी गेलो’, असं उपरोधिक ट्विट त्याने केलं.

आंदोलनासंदर्भात काय म्हटलं होतं प्रियांका आणि दिलजीतनं?

दिलजीतनं शेतकऱ्यांच्यामध्ये जाऊन, एकजुटीनं लढण्याचा संदेश ट्विटरवरून शेअर केला होता. याच ट्विटला उत्तर देताना अभिनेत्री प्रियांका चोप्रानं शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लवकर लक्ष दिलं पाहिजे, असं ट्विट केलं होतं. प्रियांकानं ट्विटमध्ये म्हटलं की, ‘आमचे शेतकरी भारताचे अन्न सैनिक आहेत. त्यांची भीती कमी करण्याची गरज आहे. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता होणे आवश्यक आहे. एक मजबूत लोकशाही म्हणून आपण हे सुनिश्चित केलं पाहिजे की लवकरात लवकर हे संकट दूर होईल.’

कंगनाने सुनावलं

प्रिय दिलजीत आणि प्रियांका.. तुम्हाला खरंच शेतकऱ्यांबद्दल कळवळा असेल किंवा तुम्ही तुमच्या आईंचा आदर करत असाल तर हा कृषी कायदा नक्की काय आहे ते एकदा जाणून घ्या. तुम्हाला शेतकऱ्यांचा वापर करून देशद्रोह्यांच्या गुड बुक्समध्ये यायचं आहे का?, असं ट्विट कंगनानं केलं होतं.