News Flash

परीक्षेला जाण्यापूर्वीच पास झाला हा ‘कच्चा लिंबू’

राष्ट्रीय पातळीवर आपल्या सिनेमाचे कौतुक होत असताना पाहिले की केलेल्या कामाचे चीज झाले असेच वाटते

कच्चा लिंबू

आज शुक्रवारी राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. स्पेशल ज्युरींनी सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून ‘कच्चा लिंबू’ची निवड केली. प्रसाद ओक दिग्दर्शित या सिनेमात बच्चूची भूमिका साकारलेल्या मनमीत पेमला सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याची बातमी तेव्हा कळली जेव्हा तो त्याच्या कॉलेजचा पेपर द्यायला जात होता. ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना मनमीत म्हणाला की, ‘मी बीएमएमच्या पहिल्या वर्षात आहे. सध्या माझे पेपर सुरू आहे. पेपर द्यायला वर्गात जात असतानाच अनेकांचे मोबाइलवर मेसेज आणि फोन यायला लागले. लोकांचे फोन आल्यानंतर मला ‘कच्चा लिंबू’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचे कळले. सुरूवातीला तर काय बोलावे ते कळतच नव्हते. माझ्यासाठी हा एक सुखद धक्काच आहे.’

मनमीत पुढे म्हणाला की, ‘हे संपूर्ण टीमचं यश आहे. प्रसाद दादाने चित्रीकरणाच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की, आपण हा सिनेमा प्रेक्षकांसाठी करत आहोत. जास्तीत जास्त लोकांना या सिनेमाचा विषय कळावा हाच संपूर्ण टीमचा प्रयत्न होता. दिव्यांग मुलांच्या पालकांना करावी लागणारी कसरत आम्ही या सिनेमातून मांडली आहे. कोणत्याही पुरस्कारांसाठी या सिनेमाची निर्मिती झाली नव्हती. पण तरीही राष्ट्रीय पातळीवर आपल्या सिनेमाचे कौतुक होत असताना पाहिले की केलेल्या कामाचे चीज झाले असेच वाटते.’

सिनेमाची कथा ही मोहन काटदरे आणि शैला काटदरे यांना एक दिव्यांग मुलगा बच्चू यांच्याभोवती फिरते. बच्चूची बुद्धी जरी लहान मुलांसारखी असली तरी त्याचं शरीर मात्र मोठ होत होतं. तरूण वयातील मुलांमध्ये ज्या काही तारूण्यसुलभ शारीरिक जाणिवा असतात तशा भावना त्याच्यामध्येही जागृत झालेल्या असतात. पण त्याची पूर्तता कशी करावी हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर आणि पर्यायाने त्याच्या आई- बाबांसमोर होता. साध्या सरळ माणसांची ही स्पेशल गोष्ट तेवढ्याच खास पद्धतीने या सिनेमातून मांडण्यात आली होती. सचिन खेडेकर, रवी जाधव, सोनाली कुलकर्णी आणि मनमीत प्रेम अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात होती. चिन्मय मांडलेकर लिखित या सिनेमाची निर्मिती मंदार देवस्थळी यांनी केली होती.

शब्दांकन- मधुरा नेरुरकर

madhura.nerurkar@loksatta.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2018 4:44 pm

Web Title: director prasad oak kaccha limbu movie win a 65th national film award best marathi film actor manmeet pem share his reaction ravi jadhav sachin khedekar sonali kulkarni
Next Stories
1 65th national film awards : ‘पावसाचा निबंध’च्या नावानं चांगभलं- नागराज मंजुळे
2 सलमानशी बिघडलेले नाते नव्याने जोडण्याचा अर्जुन कपूरचा प्रयत्न
3 ‘आज देशाची मान शरमेनं खालावली’
Just Now!
X