‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘तलाश’ या चित्रपटांसोबतच ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमधील भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची बरीच चर्चा सध्या होत आहे. नवाज चर्चेत येण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचा अभिनय. आपल्याकडे असलेल्या कलेचा अचूक वापर करत त्या माध्यमातून कलाविश्वात नाव कमवणाऱ्या नवाजविषयी दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी अत्यंत महत्त्वाचं आणि लक्षवेधी असं वक्तव्य केलं आहे.

आयएफटीडीएमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं. हिरानी यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटात नवाझने एक लहान भूमिका साकारली होती. ज्यामध्ये तो चोराच्या रुपात प्रेक्षकांना दिसला होता. बरं ही भूमिका अनेकांच्या लक्षातही नसेल. अर्थात ते नवाझच्या कारकिर्दीतील संघर्षाचे दिवस होते. त्याच्या याच भूमिकेविषयी सांगत हिरानी म्हणाले, ‘त्या एका दृश्यासाठी त्याला चित्रीकरणादरम्यान अनेकांनी मारलं होतं. त्यावेळी मी त्यांना म्हणालो होतो, नवाझ तू अगदी सुरेख अभिनय केला आहेस. एक अभिनेता म्हणून तू खूप मोठा आहेस. पण, तेव्हा मी पुसटसा विचारही केला नव्हता की आजच्या घडीला तो खरंच इतका मोठा अभिनेता होईल.’

वाचा : Section 377 verdict : ‘अखेर देशाने आम्हाला स्वीकारलं’

नवाजुद्दीनने सुरुवातीच्या काळात या कलाविश्वात बऱ्याच छोटेखानी भूमिका साकारल्या. पण, त्याने आपल्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका ही तितक्याच आत्मियतेने आणि प्रभावीपणे साकारली. जिद्द, अभिनय कौशल्य यांच्या बळावर नवाजने या कलाविश्वात प्रचंड लोकप्रियता मिळाली. सध्याच्या घडीला तो चर्चेत आहे ते म्हणजे आगामी ‘मंटो’ या चित्रपटामुळे. नंदिता दास दिग्दर्शित या चित्रपटात नवाज पुन्हा एकदा नव्या भूमिकेचं आव्हान पेलताना दिसणार आहे. तेव्हा आता त्याचं हे रुप प्रेक्षकांची मनं जिंकतं का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.